चेन्नई - आंध्र-प्रदेश, केरळ, ओडिशा, तामिळनाडूमध्ये 'फनी' चक्रीवादळ धडकणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे फनी हे चक्रीवादळ निर्माण झाले आहे. हवामान खात्याने उत्तर तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीला हे चक्रीवादळ तडाखा देणार असल्याचा इशारा दिला आहे. पुढच्या 24 तासांत या वादळाचे रुपांतर भीषण चक्रीवादळामध्ये होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, 3 मे पर्यंत पद्दुचेरी, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवरील स्थिती ठीक नाही. केरळमधील काही ठिकाणी 29 आणि 30 एप्रिल रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. फनी चक्रीवादळामुळे 1 मे ते 3 मे पर्यंत तामिळनाडू आणि इतरही काही राज्यात वादळी वारे वाहणार आहेत. त्यामुळे प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या चक्रीवादळामुळे समुद्र खवळला असल्याने मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे हवामान खात्याने म्हटले आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे याआधी 'गज' हे चक्रीवादळ निर्माण झाले होते. तामिळनाडूचा उत्तर भाग आणि आंध्रप्रदेशाच्या दक्षिण किनारपट्टीच्या दिशेने हे चक्रीवादळ पुढे सरकले होते. गुरुवारी (15 नोव्हेंबर) कुड्डालोर आणि श्रीहरीकोटा येथे हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता होती. त्यामुळे शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आली होती. तसेच भारतीय नौदल आणि तीस हजार सरकारी कर्मचारी आपत्ती व्यवस्थापनासाठी सज्ज ठेवण्यात आले होते.
'गज' चक्रीवादळा आधी तितली चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिनाऱ्यावर येऊन धडकले होते. या चक्रीवादळा दरम्यान ओडिशामध्ये प्रशासनाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला होता. तसेच सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती. जवळपास 3 लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होते. तितली हे चक्रीवादळ भयंकर असून बंगालच्या खाडीतील दक्षिण आणि पश्चिम मध्य क्षेत्राला या वादळाचा फटका बसला होता.
जाणून घ्या कशी ठरतात चक्रीवादळांची नावं
भारताच्या समुद्रालगत निर्माण होत असलेल्या वादळांना नाव देताना भारतीय हवामान खाते हे उपखंडातील आठ देशांसोबत संपर्क ठेवत असते. वादळाचे नाव हे सर्वांच्या संमतीने ठरविले जाते. नॅशनल हरिकेन सेंटर आणि वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन या दोन संस्थांकडून 1953 पासून वादळांची नावे ठरविली जातात. नॅशनल हरिकेन सेंटरचे कार्यालय अमेरिकेमधील मियामी येथे आहे. वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशनचे कार्यालय स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे आहे. दरम्यानच्या काळात उत्तर हिंद महासागरात निर्माण होत असलेल्या चक्रीवादळांना कुठलीच नावे दिली जात नव्हती. यावर भारत, पाकिस्तान, बांगलादेश, मालदिव, ओमान, म्यानमार, श्रीलंका, थायलंड या आठ देशांनी याविषयी एक बैठक घेऊन 64 नावांची यादी तयार केली आणि प्रत्येक देशात येणाऱ्या वादळांसाठी आठ नावे सुचविण्यात आली. वादळांच्या नावांची यादी प्रत्येक देशाच्या वर्णानुक्रमानुसार आहे. चक्रीवादळांना नाव देण्याचे कारण हे की वादळ पुढे सरकताना राष्ट्रा-राष्ट्रात माहितीची देवाणघेवाण होत असते. देवाणघेवाण होत असतेवेळी एकाच वादळाला वेगवेगळ्या नावांनी ओळखले गेले तर गोंधळ निर्माण होऊ शकतो. म्हणून संबंधित भौगोलिक प्रदेशातील देशांकडून सामायिकपणे सांकेतिक नावाचा वापर केला जातो.