नवी दिल्ली : गॅस सिलिंडरच्या किमती सतत वाढत असल्याने ग्रामीण भागातील अनेक गरीब कुटुंबांनी गॅसऐवजी पुन्हा चुलीचा वापर सुरू केला आहे. असे करणाऱ्यांचे प्रमाण ४२ टक्के आहे, असे एका इंग्रजी दैनिकाने केलेल्या सर्वेक्षण आढळले आहे. हा सर्व्हे केवळ पश्चिम बंगालच्या झारग्राम व पश्चिम मिदनापूर जिल्ह्यांतील ग्रामीण भागांचा असला तरी तो प्रातिनिधिक आहे.
सध्या घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमती जवळपास ९०० रुपयांच्या घरात आहेत. पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेखाली गरीब कुटुंबांना अतिशय कमी किमतीत गॅसची शेगडी व अन्य वस्तू देण्यात आल्या; पण गॅस सिलिंडरसाठी ९०० रुपये मोजणे या गरीब कुुटुंबांना मोजणेच शक्य नाही. एका महिलेने सांगितले की, ९०० रुपयांत तीन महिने पुरेल इतका लाकुडफाटा विकत घेता येतो. हा सर्व्हे १०० गावांतील ६०० हून अधिक गरीब घरात केला आहे. त्यापैकी ४२ टक्के महिलांनी सिलिंडरच्या किमती परवडत नाही, असे सांगितले. लॉकडाऊनच्या काळात ग्रामीण भागांतील अनेकांचे रोजगार गेले. शहरात राहणारे त्यांचे कुटुंबीयही आपापल्या घरी परतले. त्यामुळे खर्च वाढला.
राहुल गांधी यांची टीका
या सर्व्हेच्या आधारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्याच निर्णयांनी गरिबांना पुन्हा चुलीकडे वळण्यास भाग पाडले आहे. मोदींच्या विकासांच्या पोकळ आश्वासनांपासून गरीब दूरच आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.