नवी दिल्ली : केंद्र सरकारने रक्षाबंधनानिमित्ताने देशातील लाखो महिलांना दिलासा देत गॅस सिलिंडरच्या दरात २०० रुपयांची कपात केली असली तरी त्याचा बोजा मात्र सरकार स्वत:वर घेणार नसल्याचे समोर आले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून कच्च्या तेलातील मोठ्या घसरणीमुळे बंपर कमाई केलेल्या तेल कंपन्यांवर या २०० रुपयांचा बोजा टाकण्यात येणार आहे. यासाठी सरकार कोणतेही अनुदान देऊ शकत नाही, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत.
देशात महागाईचा दर सात टक्क्यांच्यावर गेला असून, वाढलेल्या प्रचंड महागाईने नागरिकांना मोठी आर्थिक झळ बसत आहे. या महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने स्वस्त एलपीजी सिलिंडर देण्याच्या आश्वासनाचा मुकाबला करण्यासाठी सरकारने मंगळवारी घरगुती एलपीजीच्या दरात २०० रुपयांची कपात केली आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही वर्षांत एलपीजीच्या किमती वाढल्या असून, हा निवडणुकीचा मोठा मुद्दा बनला आहे. (वृत्तसंस्था)
कंपन्या मालामाल, नागरिकांना फायदा कधी?ज्या किमतीवर देशांतर्गत एलपीजी दर ठरवले गेले आहेत ते मार्च २०२३च्या ७३२ अमेरिकी डॉलर प्रतिटनवरून जुलै महिन्यात ३८५ अमेरिकन डॉलरपर्यंत घसरले आहेत. ऑगस्टमध्ये दर वाढून ४६४ अमेरिकन डॉलरवर पोहोचले असले तरीही तेल कंपन्यांना एलपीजीच्या किमती कमी करण्यासाठी मोठी संधी आहे. त्यामुळे भविष्यात गॅस सिलिंडर आणखी स्वस्त होण्याची शक्यता आहे.
निर्णय राजकीय आहे का? : मार्च/एप्रिलमध्ये सौदी सीपीमध्ये वाढ झाली तेव्हा तिन्ही कंपन्यांना तोटा सहन करावा लागला. हे नुकसान अद्याप भरून निघाले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. जर एलपीजीच्या जागतिक स्तरावरील किमती कमी झाल्या म्हणून बोजा कंपन्यांवर टाकणे, हा दर कपातीचा एकमेव निकष असेल तर जुलैमध्येच कपात व्हायला हवी होती. हा निर्णय राजकीय असल्याचे त्यांनी सूचित केले.
कुणी केली बंपर कमाई?- इंडियन ऑइल कॉर्पोरेशन- भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड- हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड
तेल कंपन्यांनी ‘चांगले कॉर्पोरेट नागरिक’ म्हणून किमती कमी केल्या आहेत. याचवेळी त्यांनी एप्रिल-जून तिमाहीसाठी ‘खूप चांगला नफा’ मिळवला आहे. -हरदीप सिंग पुरी, पेट्रोलियम मंत्री
सध्या एलपीजी सिलिंडरमध्ये केलेली दर कपात ही रेवडी संस्कृती नाही का? उज्ज्वलासाठी ४०० रुपयांचा दिलासा ही रेवडी नाही का? मला वाटते की, ते गरीब कुटुंबांसाठी आहे. तुम्ही त्यांची आठवण काढली याचा आनंद झाला. २०२४ जवळ येत असताना तुम्ही त्यांचा अधिक विचार कराल याची मला खात्री आहे. जेव्हा विरोधी पक्ष लोकांना दिलासा देतात, तेव्हा ती रेवडी संस्कृती नसते. जय हो. - कपिल सिब्बल, राज्यसभा सदस्य