मुंबई-अहमदाबाद महामार्गावर डहाणू तालुक्यातील चारोटीजवळ झालेल्या कार दुर्घटनेत टाटा सन्सचे माजी अध्यक्ष, शापूरजी पालनजी उद्योगाचे व्यवस्थापकीय संचालक, प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासह या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी वापी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. मृत्यूचे वृत्त समजताच देशभरातील राजकीय व्यक्ती, उद्योगपती, सहकारी, मित्र यांना धक्का बसला.
अपघात नेमका कसा झाला याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एक चूक जीवावर बेतल्याचं पाहायला मिळत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या सायरस मिस्री आणि त्यांच्या सोबतच्या प्रवाशांनी सीट बेल्ट बांधला नव्हता. त्यामुळेच अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन अपघातस्थळीच त्यांचा मृत्यू झाला. सीट बेल्ट न बांधण्याची चूक सायरस आणि त्यांच्यासोबत असलेल्यांच्या जीवावर बेतली आहे. अपघात झाला तेव्हा मर्सिडीज कार (एमएच 47 एबी 6705) गुजरातहून मुंबईकडे जात होती. सूर्या नदीच्या पुलावर येताच चारोटीजवळ दुभाजकाला कार धडकली. अनाहिता पंडोले कार चालवत असल्याचे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगण्यात येत आहे.
अपघातात अनाहिता पंडोले गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यासह त्यांचे पती डॅरियस पंडोले हेदेखील जखमी झाले. त्यानंतर या दोघांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच पोलिसांनी अपघाताला अती वेग कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. कार पुलावर आली तेव्हा ती निर्धारित वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने धावत होती. कार चालकाला नीट अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. पीटीआयने याबाबत ट्विटवरून माहिती दिली आहे.
कसा झाला अपघात?
- रविवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास ते अहमदाबादवरून मर्सिडिजने मुंबईला येत होते. त्यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही भीषण दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
- चारोटी नाक्याजवळ सूर्या नदीवर बांधलेल्या नवीन पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार पुलाच्या भिंतीला धडकली. ही दुर्घटना एवढी भीषण होती, की मिस्त्री बसलेल्या भागाच्या दिशेने समोरून गाडीचे प्रचंड नुकसान झाले.
- एअर बॅग असूनही जोरदार धडकेमुळे मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. चार प्रवाशांपैकी सायरस मिस्त्री व जहांगीर दिनशा पंडोल यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर अनायता पंडोल व डेरियल पंडोल हे दोघे गंभीर जखमी झाले. मिस्त्री, जहांगीर यांच्या मृतदेहाचे मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन केले जाणार असून त्याचे व्हिडिओ चित्रीकरण केले जाणार आहे.
सायरस मिस्त्री यांचे अकाली निधन धक्कादायक आहे. भारताच्या आर्थिक पराक्रमावर विश्वास ठेवणारे ते व्यापारी नेते होते. त्यांच्या जाण्याने उद्योग जगताचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
प्रख्यात उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या निधनाने उद्योग आणि आर्थिक जगताची मोठी हानी झाली आहे. भारताची आर्थिक शक्ती ओळखणारे, एक उमदे असे ते व्यक्तिमत्त्व होते. या दुर्दैवी अपघाताबाबत माहिती घेतली असून, राज्याच्या पोलीस महासंचालकांना या अपघाताची सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे.
- देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री