मुंबई - टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचं पालघर येथे झालेल्या भीषण अपघातात निधन झालं होतं. त्यानंतर आज मंगळवारी मुंबईमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मध्य मुंबईतील वरळी येथे इलेक्ट्रिक शवदाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सायरस मिस्त्री हे पारशी होते. मात्र त्यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार का करण्यात आले याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. त्यामागचं कारण पुढीलप्रमाणे आहे.
पारसी धर्मामध्ये अंत्यसंस्काराची पद्धत इतर पद्धतींपेक्षा वेगळी आहे. पारशी धर्मामध्ये हिंदूंप्रमाणे दहन किंवा मुस्लिम, ख्रिश्चनांप्रमाणे मृतदेह दफन केला जात नाही. तर पारशी समुदाय हा मृत्यूनंतर मृतदेहाला टॉवर ऑफ सायलेन्सवर ठेवतात. तिथे गिधाडं येऊन तो मृतदेह खातात. गिधाडांनी मृतदेह खाणं हा पारशी रीतीरिवाजाचा भाग आहे.
सायरस मिस्त्री यांच्यावर पारशी रीतीरिवाजांऐवजी हिंदू पद्धतीनुसार अंत्यसंस्कार का झाले, यामागे एक एक कारण आहे. ते कारण म्हणजे कोरोनाच्या साथीमुळे जगभरातील रीतीरिवाज, राहण्याच्या पद्धती, लग्नापासून अंत्यसंस्कारापर्यंत सगळ्या पद्धती बदलाव्या लागल्या आहेत. कोरोनाच्या साथीचा परिणाम या समुहाच्या अंत्यसंस्काराच्या पद्धतीवरही पडला.
केंद्र सरकारने कोरोनाच्या साथीदरम्यान एक एसओपी जारी करून पारसी समाजाच्या अंत्यसंस्काराच्या रीतीरिवाजांवर बंदी आणली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टानेही या एसओपीविरुद्ध आदेश देण्यास नकार दिला होता.