नवी दिल्ली - दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार मरणोत्तर जाहीर झाला आहे. 65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज झाली. त्यावेळी विनोद खन्ना यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. 70 च्या दशकात उत्तम अभिनेता म्हणून बॉलीवूड गाजवणाऱ्या विनोद खन्ना यांनी उत्तरार्धात कुशल नेता म्हणूनही छाप पाडली होती. गतवर्षी दीर्घ आजारामुळे त्यांचे निधन झाले.
नवी दिल्ली येथी शास्त्री भवन येथे आज शेखऱ कपूर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या पुरस्करांची घोषणा केली. यावेळी विनोद खन्ना यांना मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला. शेखर कपूर यांच्या अध्यक्षतेखालील या ज्युरींच्या समितीमध्ये गीतकार महबूब, राजेश मापुसकर, त्रिपुरारी शर्मा आदींचा समावेश होता. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 3 मे रोजी होणार आहे.
मन की मीत या चित्रपटातून विनोद खन्ना यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती. त्यांनी कारकिर्दीत खलनायकाच्या भूमिकेकडून नायकाच्या भूमिकेकडे यशस्वी प्रवास केला. 1971 साली प्रदर्शित झालेला हम तुम और वो हा त्यांचा नायक म्हणून पहिला चित्रपट होता. ‘अमर अकबर अँथनी’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘ज़मीर’, ‘हेराफेरी’, ‘बर्निंग ट्रेन’... ‘अमर अकबर अँथनी’ हे विनोद खन्ना यांचे विशेष गाजलेले चित्रपट होते.
विनोद खन्ना यांनी गुरुदासपूर येथून निवडणूक लढवली. तेथून ते जिंकूनही आले. त्यानी वाजपेयी सरकारमध्ये काही काळ सांस्कृतिक आणि पर्यटन खात्याचे मंत्रिपद भूषवले, तसेच नंतर परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्रिपदही भूषवले.