नवी दिल्ली - दादासाहेब फाळके पुरस्कारप्राप्त चित्रपट दिग्दर्शक मृणाल सेन यांचे रविवारी (30 डिसेंबर) निधन झाले आहे. ते 95 वर्षांचे होते. मृणाल यांनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी मोलाचे योगदान दिले. 14 मे 1923 रोजी फरीदपूरमध्ये त्यांचा जन्म झाला होता. 1955 मध्ये 'रातभोर' या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. मृणाल यांनी बांगला भाषेतील चित्रपटांची सर्वाधिक निर्मिती केली.
1960 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'नील आकाशेर नीचे' या चित्रपटामुळे मृणाल सेन यांची ओळख निर्माण झाली. 'बाइशे श्रावण' या चित्रपटामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली. मिथुन चक्रवर्ती यांचा पहिला चित्रपट ‘मृगया’चे दिग्दर्शन ही त्यांनी केले होते. मृणाल सेन यांना 20 राष्ट्रीय आणि 12 आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
2002 साली वयाच्या 80 व्या वर्षी मृणाल यांनी ‘आमार भुवन’ या शेवटच्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. सत्तर-ऐंशीच्या दशकात सुरू झालेल्या समांतर चित्रपट चळवळीत त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. 2005 साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मृणाल सेन यांच्या निधनावर राजकीय, सांस्कृतिक जगतातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.