Dadra Nagar Haveli Election 2021 Result: मुंबई/सिल्व्हासा - केंद्रशासित प्रदेश असलेल्या दादरा-नगर हवेलीमधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकणार हे आता निश्चित झाले आहे. दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांनी मोठी आघाडी घेतली आहे. दुपारी १२ वाजेपर्यंतच्या मजमोजणीमध्ये कलाबेन डेलकर यांनी ४४ हजार ७२३ मते मिळवत प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवार महेशभाई गावित यांच्यावर १५ हजार ३३५ मतांची भक्कम आघाडी मिळवली आहे.
दादरा नगर हवेली मतदारसंघात झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सकाळपासून सुरू आहे. यामध्ये दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी आणि शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. प्रत्येक फेरीअखेर डेलकर यांची आघाडी वाढत गेली. त्यामुळे भाजपाचे उमेदवार महेशभाई गावित मोठ्या फरकारने पिछाडीवर पडले आहेत. तर शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेर पहिला खासदार विजयी होणे आता काही तासांवर आले आहे.
या मतमोजणीमध्ये दुपारी १२ वाजेपर्यंतच्या निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार कलाबेन डेलकर यांना ४४ हजार ७२३ मते मिळाली आहेत. कर भाजपाचे महेशभाई गावित यांना २९ हजार ३८८ मते मिळाली आहेत. अशा प्रकारे कलाबेन डेलकर यांनी महेशभाई गावित यांच्यावर १५ हजार ३३५ मतांची भक्कम आघाडी मिळवली आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसच्या महेशभाई धोडी यांना १९४७ मते मिळाली आहेत.
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्याने येथील लोकसभेची जारा रिक्त झाली होती. डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केल्यानंतर त्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोपही झाले होते. त्यावरून शिवसेनाही आक्रमक झाली होती. दरम्यान, येथे लागलेल्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेने मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपाकडून महेशभाई गावित यांना उमेदवारी दिली गेली.