मुंबई - शिवसेनेने प्रतिष्ठेच्या केलेल्या दादरा नगर हवेली लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सुरुवातीच्या मतमोजणीमध्ये शिवसेना जोरदार मुसंडी मारताना दिसत आहे. सुरुवातीच्या मतमोजणीमध्ये शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांनी भाजपाच्या महेशभाई गावित यांच्यावर ५ हजार ५०६ मतांनी आघाडी घेतली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेले काँग्रेसचे उमेदवार महेशभाई धोडी यांना केवळ ५७९ मते मिळाली आहेत.
दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्याने येथील लोकसभेची जारा रिक्त झाली होती. दरम्यान, येथे लागलेल्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेने मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी दिली होती. तर भाजपाकडून महेशभाई गावित यांना उमेदवारी दिली गेली.
दरम्यान, आज सुरू असलेल्या मतमोजणीमध्ये कलाबेन डेलकर ह्या सुरुवातीपासूनच आघाडीवर आहेत. निवडणूक आयोगाच्या १० वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांना १८ हजार ९९२ मते मिळाली आहेत. तर भाजपाच्या महेशभाई गावित यांना १३ हजार ४८६ मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार महेशभाई धोडी यांना ७४७ मते मिळाली आहेत. आता कलाबेन डेलकर यांनी ही आघाडी कायम ठेवल्यास शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर पहिला आमदार मिळण्याची शक्यता आहे.