ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - घरात गोमांस शिजवल्याच्या व खाल्ल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेशच्या दादरीमध्ये मोहम्मद इखलाख या इसमाचा जमावाच्या मारहाणीत झालेल्या मृत्यू प्रकरणातील चौकशी अहवाल सादर झाला असून इखलाखच्या घरात बीफ नव्हे तर मटण होते असे पशुवैद्यकीय विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जमावाच्या मारहाणीत मोहम्मद इखलाखचा मृत्यू झाला तर त्याचा लहान मुलगा गंभीर जखमी झाला.
उत्तर प्रदेशमधील दादरी येथील बिसाहडा गावातील जमावाने २९ सप्टेंबर रोजी बीफ खाल्ल्याच्या संशयावरून इखलाख व त्याच्या मुलाला बेदम मारहाण केली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या इखलाखचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशात बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने देशातील धार्मिक शांततेचा भंग करणा-या घटनांबद्दल गृह मंत्रालयाने चिंता व्यक्त केली होती. केंद्र सरकारने याप्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारला अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. राष्ट्रपती व पंतप्रधानांनीही याप्रकरणी दु:ख व्यक्त केले होते तर उत्तर प्रदेश सरकारच्या अहवालात या प्रकरणात सांप्रदायिक हिंसेचा उल्लेख नसल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितले होते.
याप्रकरणी पशुवैद्यकीय विभागालाचा अहवाल आला असून इखालखच्या घरातील फ्रीजमध्ये बीफ नव्हते, ते बक-याचे मटण होते, असे त्या अहवालात म्हटले आहे. याप्रकरणी गेल्या आठवड्यात ग्रेटर नोएडा येथील न्यायालयात भाजपा नेता संजय राणा यांच्या मुलासह १५ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.