ऑनलाइन लोकमत
रांची, दि. १९ - घरात गोमांस शिजवून खाल्ल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेशच्या दादरीमध्ये मोहम्मद इखलाख या इसमाचा जमावाच्या मारहाणीत झालेल्या मृत्यूच्या धक्कादायक घटनेची झारखंडमध्ये पुनरावृत्ती झाली आहे. आठ म्हशींना बाजारात घेऊन जाणा-या दोन मुस्लिम व्यापा-यांना बेदम मारहाण करून त्यांचे मृतदेह झाडाला टांगल्याची खळबळजनक घटना रांचीपासून १०० किमी अंतरावर घडली. शुक्रवारी संध्याकाळी लातेहार जिल्ह्यातील बलुमाठ जंगलात दोन व्यापा-यांचे झाडाला टांगलेले मृतदेह आढळून आले. पशु संरक्षण समितीच्या सदस्यांनी हे कृत्य केल्याची शंका व्यक्त होत आहे.
मोहम्मद मजलूम (३५) आणि आझाज खान उर्फ इब्राहिम (वय १५) अशी त्या दोघांची नावे असून ते पशू व्यापारी होते. अज्ञातांनी त्यांना मारहाण करून, त्यांची हत्या करून त्यांचे हात मागे बांधून व तोंडात कापडचा बोळा कोंबून मृतदेह झाडाला लटकवले होते.
' ज्याप्रकारे त्यांची हत्या करून त्यांचे मृतदेह झाडाला लटकावण्यात आले होते, ते पाहून हत्या करणा-यांच्या मना किती घृणा भरली होती याची कल्पना येऊ शकते' अशी माहिती पोलिसांनी दिली.
या घटनेमागे हिंदू कट्टरवाद्यांचा हात असल्याचा दावा झारखंड विकास मोर्चाचे स्थानिक आमदार प्रकाश राम यांनी केला आहे. ते दोघे पशू व्यापारी असल्यानेच त्यांना लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप गावक-यांनी केला असून या घटनेविरोधात त्यांनी जोरदार निदर्शने केली.
दरम्यान याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस गुन्हेगारांचा कसून शोध घेण्यात येत आहे.