नवी दिल्ली, दि. 30 - एवढ्या मोठ्या देशात जीएसटीची अंमलबजावणी हे यश आहे, जगातील अर्थतज्ज्ञ त्याची नक्की दखल घेतील. देशात GST लागू होणं ही ऐतिहासिक घटना आहे असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मधून व्यक्त केले आहे. मन की बात या कार्यक्रमाच्या 34 व्या भागातून त्यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एक जुलैपासून लागू करण्यात आलेल्या जीएसटीबद्दल मत व्यक्त केलं. जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम झाला आहे. तसेच नवी नोंदणी झाली आहे. जीएसटीमुळे ग्राहकांचा व्यापाऱ्यांवरील विश्वास वाढला आहे. तसेच जीएसटी लागू होऊन एक महिना झाला असून त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसत आहेत. जीएसटीचा सर्वात जास्त फायदा गरीब जनतेला होईल असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.दरम्यान, संपूर्ण देशाचे एका बाजारपेठेत रूपांतर करण्यासाठी गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स (जीएसटी) अर्थात वस्तू व सेवा कर लागू करावा, अशी शिफारस 2003 मध्ये केळकर समितीने केल्यानंतर अखेर 14 वर्षांनंतर, 1 जुलैपासून हा कर प्रत्यक्षात लागू झाला. यामुळे काही वस्तू व सेवा महाग झाल्या, तर काही स्वस्तही झाल्या. मात्र हा कर लागू झाल्यानंतर वस्तू व सेवा स्वस्त होण्यास काही कालावधी जावा लागणार आहे.
गुजरातसह अन्य पाच राज्यात पुरामुळे हाहाकार निर्माण झाला असून घरादारात पाणी शिरल्याने प्रत्येकजण जीव वाचविण्याची धडपड करताना दिसत आहे. या नैसर्गिक घटनेबद्दलही मोदी यांनी मन की बात मधून प्रकाश टाकला. ते म्हणाले पर्यावरणातील बदलांमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी लष्कर, एनडीआरएफ, निमलष्करी दलाचे जवान झटत आहेत. या राज्यातील पूरस्थिती लवकरच नियंत्रणात येईल व तेथील जनजिवन पुर्वरत होईल.