शिर्डी : सध्या देशभरात रेल्वेची साडेआठ लाख कोटींची विकासकामे सुरू असून त्यामध्ये राज्यातील एक लाख,३६ कोटींच्या कामांचा समावेश आहे,अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली़.शिर्डी रेल्वेस्थानकावर विविध उपक्रमांचे उद्घाटन, तसेच साईनगर शिर्डी ते मुंबई साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेस गाडीचा शुभारंभ प्रभू यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, नगराध्यक्षा योगिता शेळके, खासदार सदाशिव लोखंडे, संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, संस्थानच्या सीईओ रूबल अग्रवाल, महाव्यवस्थापक डी. के. शर्मा आदीं यावेळी उपस्थित होते़रेल्वे प्रवाशांना स्वस्तात स्वच्छ पिण्याचे पाणी, वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. रेल्वे विभागात आलेल्या प्रत्येक पत्र, निवेदनाची दखल घेतली जाते. जे काम होण्यासारखे आहे ते तत्काळ मार्गी लावले जाते. तर प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी गतीने प्रयत्न केले जातात असे सांगून चार धाम यात्रेसाठी रेल्वेने सर्वेक्षण सुरू केले आहे, असे प्रभू यांनी सांगितले.शिर्डी स्थानकातील पूल, फलाट क्रमांक २, वॉटर वेंडिंग मशिन आदी सुविधांचे लोकार्पण सुरेश प्रभू यांच्या हस्ते झाले.
देशभरात रेल्वेची ८.५ लाख कोटींची कामे - प्रभू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 3:04 AM