गेल्या काही दिवसापासून देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. ७ महिन्यांनंतर, भारतात कोरोना रुग्णांची संख्या एका दिवसात ८०० च्या जवळ पोहोचली आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट JN.1 च्या रुग्णांमध्ये देखील वाढ दिसून आली आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत कोविडमुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येत आहे. मात्र, आता दिल्लीतही नवीन व्हेरिएंट JN.1 चे प्रकरण समोर आले आहे. तज्ञ लोकांना घाबरू नका असा सल्ला देत आहेत.
कोरोनाचा नवीन व्हेरियंट अतिशय सौम्य असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. बहुतेक रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज नसते. पण बदलत्या हवामानात वाढत्या कोविड प्रकरणांमुळे लोकांची चिंता नक्कीच वाढली आहे.
गेल्या २४ तासांत ७९७ नवीन रुग्ण आढळून आली आहेत, जे सात महिन्यांतील सर्वाधिक आहे आणि पाच नवीन मृत्यू झाले आहेत. केरळमध्ये दोन आणि महाराष्ट्र, पुद्दुचेरी आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
देशात १८ मे रोजी दैनंदिन रुग्णांची संख्या जास्त नोंदवली होती, तेव्हा संख्या ८६५ होती. ५ डिसेंबरपर्यंत दैनंदिन रुग्णांची संख्या दुहेरी आकडीपर्यंत घसरली होती, पण जेएन 1 नंतर रुग्णांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यात, देशातील सर्वाधिक दैनंदिन कोविड रुग्णांची संख्या ७५२ होती, जी २२ डिसेंबर रोजी नोंदवली होती.
महाराष्ट्रात किती रुग्ण?
कोरोनाच्या नवीन सबवेरियंट JN.1 चे केसेस देखील भारतात झपाट्याने वाढत आहेत. देशात आतापर्यंत JN.1 प्रकाराच्या १६२ रुग्ण आढळून आली आहेत. सर्वाधिक प्रकरणे केरळमधील आहेत. केरळमध्ये नवीन प्रकाराची ८३ प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. गुजरातमधील ३४, गोव्यातील १८, कर्नाटकातील ८, महाराष्ट्रातील ७, राजस्थानमधील ५, तामिळनाडूतील ४, तेलंगणातील २ आणि दिल्लीतील १ रुग्ण आढळून आला आहे. जे.एन.1 च्या एकाही रुग्णाची प्रकृती गंभीर नाही ही दिलासादायक बाब आहे. त्याची लक्षणे सामान्य असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.