नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर कायम असल्याचे दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस नवीन उच्चांक गाठत असून, कोरोनाच्या मृत्यूचे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळे ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, कोरोना लस यांचा मोठा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून पंतप्रधाननरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. मात्र, पंतप्रधाननरेंद्र मोदी खूप मेहनत घेत आहेत. संकटसमयी संयमाने काम करत आहे, असे एका लेखात म्हटले आहे. (the daily guardian article claims that pm narendra modi working hard in corona situation)
‘द डेली गार्डियन’ या इंग्रजी वेबसाइटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याची, कामाची दखल घेणारा एक लेख छापून आला आहे. या लेखाची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. बहुतांश भाजप नेत्यांना हा लेख आपापल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. यानंतर सोशल मीडियावर एका वेगळ्या चर्चेलाही सुरूवात झाली आहे.
निवडणूक ड्युटीवर कोरोनामुळे मृत्यू झाल्यास १ कोटींची भरपाई मिळायला हवी: हायकोर्ट
पंतप्रधान खूप मेहनत घेत आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी खूप मेहनत घेत आहेत, विरोधी पक्षांच्या जाळ्यात अडकू नका. देशाला असे पंतप्रधान लाभलेत जे संकटसमयी शांतपणे आपले काम करत आहेत आणि कोणतीही राजकीय प्रतिक्रिया देण्यापासून ते दूर आहेत. कारण या सर्व गोष्टींसाठी ही वेळ योग्य नाही. ते आपले लक्ष आणि ऊर्जा संकटावर मात करण्यासाठी वापरत आहेत तसेच दुप्पटीने काम करत आहेत, असे नमूद करत इतरांप्रमाणेच त्यांनीदेखील 'क्राय बेबी' बनून प्रश्नांचीच चर्चा केली तर उत्तरे कोण शोधणार, अशी विचारणा या लेखातून करण्यात आली आहे.
आता केवळ ‘या’ एकाच अटीवर भारताशी चर्चा शक्य; इम्रान खान यांनी केले स्पष्ट
राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
पंतप्रधान मोदी काम करत असल्याचा प्रचार भाजपा नेत्याकंडून केला जात असतानाच शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी सर्व नेत्यांनी केलेल्या ट्विटचे स्क्रीनशॉर्ट शेअर केले आहेत. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमे आपल्याला प्रश्न विचारत असले म्हणून काय झाले? आम्ही आमचा प्रचार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय वेबसाईटसारखी दिसणारी साईट निर्माण करु, असा टोला लगावत यासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दरम्यान, कम्युनिस्ट पक्षाचे दीपांकर यांनी किरेन रिजिजू यांच्या ट्विटचा स्क्रीनशऑर्ट शेअर करत, केवळ रिजिजू आहेत की संपूर्ण मंत्रीमंडळाने ‘आता मोदी खूप मेहनत करताना दिसत आहेत’ असे म्हणत कुठे क्लिक करावे यासंदर्भातील ट्विट केलं आहे? रोजच्या मनोरंजनासाठी आणि सकारात्मकतेसाठी द डेली गार्डियनवर विश्वास ठेवा, असा चिमटा काढला आहे.