तामिळनाडूच्या डिंडीगुल येथील एका मजुराच्या मुलीने बारावीच्या बोर्ड परीक्षेत 600 पैकी 600 म्हणजेच सर्वच्या सर्व विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. सरवन कुमार यांची मुलगी नंदिनी अन्नामलाईयार गर्ल्स हायर सेकेंडरी स्कूलमध्ये शिकली आणि तिची 12वीची परीक्षा डिस्टिंक्शनने उत्तीर्ण झाली. सोमवारी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर होताच नंदिनीने सर्व विषयांत 600/600 गुण मिळवून तिच्या शिक्षकांची आणि पालकांची मान अभिमानाने उंचावली आहे.
नंदिनीने दिलेल्या माहितीनुसार, "माझा यावर विश्वास बसत नाही आहे. मला असे प्रोत्साहन देण्यासाठी माझे पालक आणि माझे नातेवाईक तसेच माझी शाळा आणि माझे शिक्षक जबाबदार आहेत. मी माझ्या शिक्षकांचे आभार मानते. माझ्या पालकांचा पाठिंबा आणि मला अभ्यासासाठी वेळ देणे हेच माझ्या विजयाचे कारण आहे." नंदिनीने सांगितले की, ती दररोज 8 ते 9 तास अभ्यास करायची, त्यामुळेच ती सर्व विषयांवर कमांड मिळवू शकली.
राज्याचे शिक्षण मंत्री अनबिल महेश यांनी इंडिया टुडेशी संवाद साधला जेथे त्यांनी सांगितले की यावर्षी उत्तीर्णतेची टक्केवारी 0.27% वाढली असल्याने मला आनंद झाला आहे. मुलांचा आत्मविश्वास वाढवण्याची विनंतीही शिक्षणमंत्र्यांनी पालकांना केली. ते म्हणाले, 'ज्याला 35 गुण मिळाले आणि ज्याला 100 गुण मिळाले ती दोन्ही आमची मुले आहेत.
मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करा. सीएम स्टॅलिन यांनी 'नान मुधलवन' योजना सुरू केली आहे ज्याद्वारे आपण टॅलेंट ओळखू. शालेय शिक्षण मंत्री आणि दोन मुलांचा पिता या नात्याने मी पालकांना त्यांच्या मुलांच्या टॅलेंटचं कौतुक करायला सांगतो, मग त्यांना कितीही मार्क मिळाले तरी चालतील. पैकीच्या पैकी मार्क मिळाल्यानंतर आता नंदिनीची जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.