ऑनलाइन लोकमत
पेईचिंग, दि. 21 - आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या चीनला भारताने त्यांच्याविरोधात वापरलेले दलाई लामा कार्ड चांगलेच झोंबले आहे. चीनने अरुणाचल प्रदेशमधील सहा ठिकाणांच्या केलेल्या नामांतराविरोधात भारताने दिलेल्या प्रतिक्रियेवर टीका करत चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दलाई लामांचा चिनविरोधात वापर सुरू ठेवला तर त्याची जबर किंमत भारताला मोजावी लागेल अशी धमकी दिली आहे.
चीनच्या तिबेटवरील आक्रमणानंतर भारतात विस्थापित झालेले बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांना अरुणाचल प्रदेशाचा दौरा करण्याची परवानगी देत भारताने चिनी ड्रॅगनच्या शेपटीवर पाय ठेवला होता. तेव्हापासून चवताळलेल्या चीनने भारताविरोधात कारस्थानांना सुरुवात केली आहे. त्यानंतर चीनने अरुणाचल प्रदेशमधील सहा ठिकाणांचे नामांतर केले होतो. तर भारताने चीनचे हे पाऊल मुर्खपणाचे आहे, अशी टीका भारताने केली होती.
या टीकेला चीनमधील सरकारी वृत्तपत्राने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. भारताकडून वापरण्यात येत आहे दलाई कार्ड, चीनसोबत क्षेत्रीय विवाद चिघळला, अशा शीर्षकाखाली एक लेख चीनच्या वृत्तपत्रात प्रकाशित झाला आहे. त्यात चीनने दक्षिण तिबेटमधील काही ठिकाणांचे नामांतरा का केले याचा विचार भारताने केला पाहिजे. केवळ दलाई लामा सांगतात म्हणून अरुणाचल प्रदेश भारताचा होऊ शकत नाही, असे या लेखात म्हटले आहे. तसेच भारताकडून अशा कुरापती चालू राहिल्या तर त्याची भारताला जबर किंमत मोजावी लागेल, असा इशाराही चिनी वृत्तपत्राने दिला आहे.