धर्मशाळा : तिबेटचे सर्वोच्च धार्मिक नेते दलाई लामा यांची १९६६ मधील सर्वोत्तम समजली जाणारी व टू ए मालिकेतील लँड रोव्हर कारचा (नंबर एचआयएम-७५५५) अमेरिकेत लिलाव होणार आहे.पन्नासपेक्षा जास्त वर्षे जुनी असलेली ही कार आर. एम. सूथबायने विकायला काढली आहे. सूथबायचे मुख्यालय ओंटारियोत असून, अमेरिका, इंग्लंड आणि जर्मनीत तिची कार्यालये आहेत. या कारच्या लिलावात भाग घेण्यासाठीच्या निविदा भरण्यास जुलै महिन्यात सुरुवात झाली. लिलाव २९ आॅगस्ट ते एक सप्टेंबरदरम्यान होईल. दलाई लामा यांनी या कारचा उपयोग १९६६ ते १९७६ या दरम्यान खासगी प्रवासासाठी केला होता.दलाई लामा यांचे बंधू तेनझिन चोग्याल यांनी ही कार चालवीत भारतात आणली व तेव्हापासून ती दलार्ई लामा यांची कार म्हणून ओळखली जाऊ लागली. या कारने बहुतेक वेळा चोग्याल यांनी दलाई लामा यांना धर्मशाळा प्रांतातील डोंगराळ रस्त्याने नेले व आणले. १९७६ मध्ये ही कार वापरणे थांबण्यात आले. त्यानंतर अमेरिकेत येणाऱ्या तिबेटी निर्वासितांसाठी निधी उभारण्यास ती कार कॅलिफोर्नियातील दलाई लामा फाऊंडेशनला देणगी दिली गेली. (वृत्तसंस्था)