चंडीगड : हेरगिरीच्या आरोपाखाली पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू झालेल्या सरबजीत सिंग (Sarabjit Singh) यांची बहीण दलबीर कौर (Dalbir Kaur) यांचे शनिवारी रात्री उशिरा निधन झाले. 60 वर्षीय दलबीर कौर यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका (cardiac arrest)असल्याचे सांगण्यात येत आहे. पंजाबमधील रहिवासी सरबजीत सिंग यांना पाकिस्तानातून भारतात परत आणण्यासाठी दलबीर कौर यांनी मोहीम सुरू केली होती. मिळालेल्या माहितीनुसार दलबीर कौर यांच्या पार्थिवावर आज पंजाबमधील भिखीविंडमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. सरबजीत सिंग यांना पाकिस्तानी न्यायालयाने दहशतवाद आणि हेरगिरीसाठी दोषी ठरवले होते आणि 1991 मध्ये त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, 2008 मध्ये सरकारने सरबजीत सिंग यांच्या फाशीला अनिश्चित काळासाठी स्थगिती दिली होती. यानंतर एप्रिल 2013 मध्ये लाहोरमध्ये कैद्यांनी केलेल्या हल्ल्यात सरबजीत सिंग यांचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, सरबजीत सिंग यांनी पाकिस्तानमध्ये दावा केला होता की, ते एक शेतकरी आहेत आणि त्यांचे सीमेजवळ घर आहे. ते चुकून पाकिस्तानच्या हद्दीत गेले, मात्र त्यांना अटक करण्यात आली. यानंतर त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. सरबजीत सिंग यांची बहीण दलबीर कौर डिसेंबर 2016 साली भाजपमध्ये सामील झाल्या होत्या. सरबजीत सिंग यांच्या सुटकेसाठी दलबीर कौर यांनी मोठा लढा उभारला होता. तसेच, सरबजीत सिंग यांच्या जीवनावर बॉलिवूडमध्ये एक चित्रपट बनवण्यात आला होता. या चित्रपटात सरबजीत सिंग यांची भूमिका अभिनेता रणदीप हुड्डाने केली होती तर दलबीर कौर यांची भूमिका ऐश्वर्या रायने केली होती.