नवी दिल्ली : गुजरातच्या बेट व्दारका मंदिरात माजी केंद्रीय मंत्री सेलजा यांच्या संदर्भातल्या दलित भेदभाव प्रकरणी, राज्यसभेत ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी ‘मॅन्युफॅ क्चर्ड डिस्क्रिमिनेशन’ या शब्दप्रयोगासह आपले विधान मागे घेतले. झाल्याप्रकरणी खेद व्यक्त केला तर अर्थमंत्री जेटली म्हणाले, गुजरातच्या व्दारकाधीश आणि बेट व्दारका मंदिरातला फरक कुमारी सेलजांच्या खुलाशामुळे स्पष्ट झाल्यामुळे मंदिर व्यवस्थापनाची तारीफ करणारा सेलजांचा मी वाचून दाखवलेला आपोआपच अभिप्राय गैरलागू ठरला आहे. गोयल यांनी व्यक्त केलेला खेद आणि जेटलींचे निवेदन सेलजा व काँग्रेसने स्वीकारल्यानंतर राज्यसभेचे बुधवारपासून खोळंबलेले कामकाज एकदाचे मार्गी लागले. गुरूवारी राज्यसभेचे कामकाज सुरू होताच सेलजा प्रकरणाचा निर्णय काँग्रेस सदस्यांनी उपसभापती कुरियन यांना विचारला. त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे घोषणा देत काँग्रेस सदस्य वेलमधे आले. गोंधळात अर्ध्या तासासाठी तहकूब झालेले कामकाज वारंवार तहकूब होत दुपारी २ वाजेपर्यंत खोळंबले. सदर प्रकरणी तोडगा काढण्यासाठी सभापतींच्या दालनात दीर्घकाळ बैठक झाली. दरम्यान पीयूष गोयल यांनी सभागृहात खेद व्यक्त करीत आपले वादग्रस्त विधान मागे घेतले. काँग्रेस सदस्यांचे मात्र तेवढयाने समाधान होत नव्हते. अखेर सभागृह नेते अरूण जेटलींच्या निवेदनानंतर कामकाज सुरळीतपणे सुरू झाले. यानंतर नेपाळमधील मधेशींच्या समस्येबाबत पवनकुमार शर्मांनी लक्षवेधीेवर बोलायला प्रारंभ करताच, या विषयावर भूमिका विस्ताराने मांडण्याची संधी सदस्यांना मिळावी, यासाठी लक्षवेधीऐवजी या विषयाचे अल्पकालीन चर्चेत रूपांतर करण्याचा निर्णय सभागृहाने घेतला. ही चर्चा आता सोमवारी होईल. त्यानंतर भ्रष्टाचार प्रतिबंधक दुरूस्ती विधेयकावर चर्चेला प्रारंभ झाला. चर्चा सुरू असतानाच राज्यमंत्री व्ही.के.सिंह सभागृहात आले व सुरूवातीला मागच्या बाकावर बसले. बसपाने त्यांच्यावर हल्ला चढवल्यामुळे गोंधळ वाढून कामकाज पुन्हा तहकूब झाले. (विशेष प्रतिनिधी)