लखनऊ: मोबाइल नंबर देण्यास नकार दिल्यानं सतरा वर्षांच्या मुलीला जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना लखनऊमध्ये घडलीय. या मुलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही मुलगी 80 टक्के भाजल्यानं तिची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणातील आरोपी मोहम्मद शफीला अटक करण्यात आली. लखनऊमधील आझमगढमधील अल्पवयीन दलित मुलीनं मोहम्मद शफी या तरुणाला तिचा मोबाइल क्रमांक नकार दिला होता. त्याचा राग मनात धरुन त्यानं तिला पेटवलं. त्यामध्ये ती 80 टक्के भाजली असून तिच्यावर शिव प्रसाद गुप्ता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर अनुसूचित जाती आणि जमातीच्या अध्यक्ष ब्रिज लाल यांनी पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पीडित कुटुंबाला साडे आठ लाख रुपयांची मदत दिली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. याशिवाय या कुटुंबाला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरदेखील दिलं जाणाराय. 'मी वारासणीला जाऊन पीडितेची भेट घेतली. पीडित मुलगी 80 टक्के भाजली आहे. मात्र तिनं मला घडलेला संपूर्ण प्रकार मला सांगितला. यानंतर मी तिच्या आईची आझमगडमध्ये जाऊन भेट घेतली,' असं लाल यांनी सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी यांच्यात आधी मैत्री होते. यानंतर मुलीनं त्याच्याशी बोलणं बंद केलं. त्यामुळे तरुण तिच्या घरी तिचा नवीन मोबाइल नंबर मागण्यास गेला. मात्र तिनं फोन नंबर देण्यास नकार दिला. याच रागातून तरुणानं तिच्यावर हल्ला केला.
धक्कादायक! मोबाइल नंबर देण्यास नकार दिल्यानं मुलीला पेटवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2018 9:36 AM