ऑनलाइन लोकमत
बल्लभगड (हरयाणा), दि. २१ - दलितांच्या एका कुटुंबाला जाळण्याची नृशंस घटना येथील सुनपेड गावात मंगळवारी घडली, यामध्ये अडीच वर्षे आणि ११ महिने वयाच्या बहीण भावांचा होरपळून मृत्यू झाला, आई ७० टक्के भाजली तर वडीलांनाही जखमा झाल्या आहेत. बुधवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधींनी या गावाला भेट दिली असून गावक-यांसह या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. गावक-यांनी वल्लभगड फरीदाबाद महामार्ग बंद पाडला असून खट्टर सरकारने कठोर पावले उचलावी तसेच सीबीआय चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास हे दलित कुटुंब झोपलेले असताना वरच्या वर्गाच्या काही जणांनी पेट्रोल ओतून घराला आग लावली. राजधानी दिल्लीच्या सीमेपासून सुनपेड हे लांब तुलनेने जवळ असून असा प्रकार खुद्द दिल्लीजवळ घडल्याने विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाजपाला धारेवर धरले आहे.
भाजपाच्या राज्यामध्ये गरीब व शोषित जनतेवर अथ्याचर होत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. आज सकाळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा कारत यांनीही पिडीत कुटुंबाची भेट घेतली.
हरयाणा पोलीसांनी चार जणांना अटक केली असून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे. जितेंद्र या पिडीताच्या सांगण्यानुसार काही दिवसांपूर्वी राजपूत समाजाच्या काही जणांबरोबर त्याचा वाद झाला होता ज्यांची पोलीस तक्रारही करण्यात आली आहे आणि त्यांनीच घराला आग लावली आहे. माझ्या कुटुंबाला संपवण्याची धमकी त्यांनी दिली होती आणि गावातून जाण्यास व परत कधीही न येण्यास सांगितले होते असेही जितेंद्र म्हणाला.