नवी दिल्ली, दि. 15 - आपले राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे एका दलित कुटुंबातून आले आहेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकेकाळी चहा विकण्याचा व्यवसाय करत होते, मी सुध्दा जन्माने भारतीय नाही तरीही आज भारताचा सरन्यायाधीश आहे, या अशा देशाबद्दल सर्वांनाच अभिमान वाटायला हवा, अशा शब्दांत सरन्यायाधीश जगदीश सिंह खेहर यांनी देशाची प्रशंसा केली आहे. तसंच भारत हा लोकशाही प्रधान देश असून या देशात सर्व धर्मांचा आदर राखला जातो ही बाब अत्यंत स्तुत्य असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालय परिसरात आयोजित कार्यक्रमात खेहर यांनी आपले विचार मांडले. खेहर म्हणाले, की भारतात विविध धर्मांचे लोक राहतात तरीही प्रत्येकजण एकमेकांच्या सोबत आहे, या देशात प्रत्येक व्यक्ती समान आहे. जेव्हा तु्म्ही स्वतंत्र असता तेव्हाच असे जगू शकता असेही सरन्यायाधीस खेहर म्हणाले. या कार्यक्रमात कायदा मंत्री रविशंकर प्रसादही उपस्थित होते.
दरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजवंदन करुन सलग चौथ्यांदा देशवासियांना संबोधित केले. देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्य दिनाच्या या शुभप्रसंगी देशवासियांना कोटी-कोटी शुभेच्छा. संपूर्ण देश आज स्वातंत्र्य दिनासोबत जन्माष्टमीचाही उत्सव साजरा करत आहे. सुदर्शन चक्राधारी मोहनपासून ते चरखाधारी मोहनपर्यंतचा वारसा आपल्याला लाभला आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या गौरवासाठी हजारो लोकांनी बलिदान दिलं, यातना-दु:ख सोसले, त्या सर्व वीरांना सव्वाकोटी देशवासियांतर्फे नमन करतो, असेही उद्गार यावेळी पंतप्रधान मोदींनी काढले.
म्हणून या गावाने नाही साजरा केला स्वातंत्र्य दिनदेशभरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असताना उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खीरी जिल्ह्यातील चौधीपूर गावातील लोकांनी स्वातंत्र्य दिन साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. येथे राहणारा बहुतांश समाज हा आदिवासी आहे. स्वातंत्र्य होवून 70 वर्ष झाली पण आमच्या आयुष्यात काहीही फरक पडलेला नाही. आम्ही अजूनही त्याच गरिबीत जगत आहोत. अशा स्वातंत्र्याचा काय फायदा?आम्हाला जर मुलभूत सुविधाच मिळत नाहीत तर आम्ही स्वातंत्र्य दिन का साजरा करावा. आमच्याकडे मुलभूत सुविधा नसल्यामुळे आम्ही स्वातंत्र्य दिन साजरा करणार नाही असं गावातील एक रहिवासी गुलाब सिंह म्हणाले.