शिमला: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शालेय विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ताणतणावाचा सामना कसा करावा, यासंदर्भात 'परीक्षा पर चर्चा' या कार्यक्रमाच्या नुकतेच मार्गदर्शन केले होते. देशभरात या उपक्रमाचे बरेच कौतुकही झाले होते. मात्र, हिमाचल प्रदेशमध्ये हा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या शाळेतील दलित विद्यार्थ्यांना इतरांपासून वेगळे बसवण्यात आल्याचा दुर्देवी प्रकार समोर आला आहे. कुलू येथील चेष्ठा ग्रामपंचायतीच्या शाळेत हा प्रकार घडला. मोदींच्या 'परीक्षा पर चर्चा' या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी शाळेच्या व्यवस्थापकीय समितीच्या अध्यक्षांचे घर निवडण्यात आले होते. मात्र, शाळेचे विद्यार्थी याठिकाणी आले तेव्हा दलित विद्यार्थ्यांना टीव्ही ठेवलेल्या खोलीबाहेर बसायला सांगण्यात आले. याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.तक्रारदारांपैकी एक असलेल्या मेहर चंद या विद्यार्थ्याने सांगितले की, आम्ही कार्यक्रम बघायला शाळेच्या व्यवस्थापकीय समितीच्या अध्यक्षांच्या घरी गेलो तेव्हा दलित विद्यार्थ्यांना टीव्ही असलेल्या खोलीच्या बसायला सांगितले. ही खोली घोड्यांसाठी वापरली जात होती. तसेच आम्हाला कार्यक्रम सुरू असताना मधूनच उठून न जाण्याविषयी बजावण्यात आले होते, असेही मेहर चंद याने सांगितले. दलित विद्यार्थ्यांनी वहीच्या एका पानावर आपली तक्रार पोलिसांना लिहून दिली. यामध्ये त्यांनी आपल्याला माध्यान्ह भोजनाच्यावेळीही इतरांपासून वेगळे बसवले जात असल्याचे म्हटले आहे. हा प्रकार उघड आल्यानंतर एका स्थानिक स्वयंसेवी संस्थेने चेष्ठी शाळेचे प्राचार्य राजन भारद्वाज आणि शाळेचे उपसंचालक जगदीश पठाणिया यांच्याविरोधात आंदोलन सुरु केले आहे.
दुर्दैवी! दलित विद्यार्थ्यांना तबेल्यात बसून ऐकावी लागली मोदींची 'परीक्षा पर चर्चा'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 11:28 AM