भोपाळ : उत्तर प्रदेशमधील दलित मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणावरून देशात संतापाचे वातावरण असतानाच मध्य प्रदेशमध्येही सामूहिक बलात्कार झालेल्या दलित महिलेने शुक्रवारी आत्महत्या केल्याचे उजेडात आले आहे.या महिलेने पोलिसांशी संपर्क साधून चार दिवस उलटले तरी एफआयआर दाखल न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहेत. या महिलेवर तीन जणांनी बलात्कार केला होता. याप्रकरणी एफआयआर दाखल न केल्याबद्दल गोटिटोरिया पोलीस ठाण्याचे प्रभारी व सहायक पोलीस उपनिरीक्षकास अटक करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक गदरवाराचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यावरही कारवाई केली जाईल. नरसिंगपूर जिल्ह्यातील ३२ वर्षीय दलित महिलेवर २८ सप्टेंबर रोजी तीन जणांनी बलात्कार केला होता. ही महिला शनिवारी विहिरीवरून पाणी आणण्यासाठी गेली असता तिला शेजारणीने टोमणे मारले.महिलांची दयनीय स्थिती - कमलनाथविरोधी पक्षनेते कमलनाथ म्हणाले की, खरगोन, सतना, जबलपूरनंतर आता नरसिंगपूर जिल्ह्यातही बलात्काराचे नवे प्रकरण उघडकीस आले आहे. बलात्कारपीडित महिलेच्या तक्रारीची दखल घेण्याऐवजी तिच्या कुटुंबालाच त्रास देण्यात आला. त्यामुळे तिने आत्महत्या केली. भाजप सरकारने ‘बेटी पढ़ाओ, बेटी बचाओ’अशी घोषणा दिली आहे; पण मध्यप्रदेशात महिलांची स्थिती दयनीय आहे.
मध्य प्रदेशात बलात्कारपीडित दलित महिलेची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2020 2:51 AM