बेंगळुरु : वाढत्या असहिष्णुतेविरोधात साहित्य विश्वातून निषेधाचे सूर उमटत असताना कर्नाटकातील एका युवा दलित लेखकास सवर्णांविरुद्ध लिहिल्यास बोटे छाटण्याची धमकी मिळाली आहे.हुचांगी प्रसाद असे या २३ वर्षीय युवा लेखकाचे नाव असून ते दावणगेरे येथे पत्रकारितेचे विद्यार्थी आहेत. त्यांनी ‘ओदाला किच्चू’ नामक पुस्तक लिहिले असून यात त्यांनी जातीव्यवस्थेवर जोरदार टीका केली आहेत. २१ आॅक्टोबरला रात्री उशिरा आठ ते नऊ अज्ञात लोक प्रसाद राहत असलेल्या वसतिगृहावर आले. प्रसादची आई आजारी आहे, असे सांगून त्यांनी प्रसाद यांना बाहेर बोलवून आपल्यासोबत नेले. यानंतर त्यांनी प्रसाद यांना एका निर्जनस्थळी हिंदू धर्म व जाती व्यवस्थेविरुद्ध लिहिणे थांबवले नाहीत, तर बोटे छाटू, अशी धमकी दिली. प्रसाद यांनी याबाबत सांगितले की, त्या लोकांनी माझा अख्खा चेहरा कुंकवाने रंगवला आणि बोटे छाटण्याची धमकी दिली. या हल्ल्यात मला किरकोळ दुखापत झाली. हल्ला करणाऱ्या व्यक्ती कोण होते, असे विचारले असता, मी त्यांना ओळखत नाही. पण त्यांच्या भाषेवरून ते एखाद्या हिंदुत्ववादी संघटनेचे लोक असावे असा माझा अंदाज आहे. अर्थात मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही, असे प्रसाद म्हणाले.
दलित लेखकाला अज्ञातांची धमकी
By admin | Published: October 24, 2015 3:10 AM