देहरादून: लग्नात खुर्चीवर बसून जेवल्यानं उच्चवर्णीयांनी केलेल्या मारहाणीत दलित तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना तेहरी गरहवाल तालुक्यातल्या श्रीकोटमध्ये घडली. या मारहाणीमुळे तरुणाचा मृत्यू झाला. 26 एप्रिलला ही घटना घडली. मात्र अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. 'हिंदुस्तान टाईम्स'नं हे वृत्त दिलं आहे.26 एप्रिलला जितेंद्र दास एका लग्नाला होता. त्यावेळी काही उच्चवर्णीयांनी जितेंद्रला मारहाण केली. याबद्दलची माहिती जितेंद्रच्या मित्रांनी त्याच्या कुटुंबाला दिली. सात जणांनी जितेंद्रला लग्नात मारहाण केली. त्यानंतर जितेंद्र तिथून निघाला. मात्र त्या सात जणांनी त्याचा पाठलाग केला आणि पुन्हा मारहाण केली, असं जितेंद्रचे काका इलम दास यांनी सांगितलं. 'त्या रात्री जितेंद्र लग्नात जेवत होता. त्यावेळी आमच्याच भागात राहणाऱ्या सात जणांनी त्याला शिवीगाळ केली. आम्ही उभे असताना आमच्यासमोर बसून कसा काय जेवतोस, असा प्रश्न विचारत त्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या सात जणांनी जितेंद्रला जातीवाचक शिवीगाळदेखील केली,' असं दास यांनी सांगितलं. मारहाणीमुळे जितेंद्रच्या डोक्याला आणि गुप्तांगाला जबर दुखापत झाली होती, अशी माहिती त्याचा भाऊ प्रितम दासनं दिली. जबर मारहाणीनंतर जितेंद्र कसाबसा घरी पोहोचला. मात्र त्यानं याबद्दलची माहिती कुटुंबीयांना दिली नाही. त्या रात्री तो घराबाहेरच झोपला. सकाळी तो कुटुंबाला बेशुद्ध अवस्थेत दिसला. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. मात्र त्याचा मृत्यू झाला. यानंतर जितेंद्रच्या बहिणीनं पोलिसात तक्रार दाखल केली. मारहाण करणाऱ्या सात जणांविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली आणि एससी/एसटी अॅट्रॉसिटी कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती नरेंद्र नगरचे पोलीस अधिकारी उत्तम सिंह यांनी दिली. या प्रकरणात कोणीही साक्षीदार पुढे आलेला नाही. मात्र आता जितेंद्रचा मृत्यू झाल्यानं सात आरोपींना खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात येईल, असं सिंह म्हणाले.
धक्कादायक! लग्नात खुर्चीवर बसून जेवल्यानं दलित तरुणाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 10:36 AM