नवी दिल्ली : ‘सरकारने आम्हालाच दोषी ठरवून देशद्रोही म्हणून संबोधले. त्यामुळे आम्ही संतप्त नाही, तर दुखावलो आहे,’ या शब्दांत शाहीनबागमधील आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मध्यस्थ समितीकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आणि अश्रुंनाही वाट मोकळी करून दिली. पहिल्या दिवशीच्या चर्चेतून मार्ग न निघाल्याने मध्यस्थ पुन्हा गुरुवारी चर्चा करणार आहेत.
दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू असून प्रथमच त्यांच्याशी चर्चा सुरू झाली. हा तिढा सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ अॅड. संजय हेगडे व अॅड. साधना रामचंद्रन यांना नेमले आहे. आंदोलकांनी त्यांचे टाळ््यांनी स्वागत केले. आमच्याशी बोलायला कुणी तरी आले आहे. एवढे दिवस आंदोलन करतोय, पण सरकारने आमचे ऐकून घेण्याची तसदी घेतली नाही. आंदोलनाची जागा बदलली तर सरकार आमचे ऐकणार आहे का?, असा सवाल आंदोलकांनी केला. आम्ही सरकारशी चर्चा करू इच्छितो, असे ते म्हणाले. आतापर्यंत दोन लोकांना आम्ही बंदुकीसह पकडून पोलिसांना सोपवले आणि त्पोलिसांनी त्यांना मोकळे सोडले, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. आंदोलन करणे तुमचा अधिकार आहे, पण इतरांचेही मुलभूत अधिकार आहेत. आपले अधिकार वापरताना दुसऱ्यांच्या अधिकारांवर गदा येत असेल तर काय उपयोग?,’ असा सवाल अॅड. साधना रामचंद्रन यांनी त्यांना केला.‘येथून जाणार नाही’‘एनआरसी व सीएए रद्द केल्याशिवाय आंदोलन संपवणार नाही. गोळ््या झाडल्या तरी इथून जाणार नाही. आम्ही ब्रिटिशांना देशातून बाहेर काढले, तर नरेंद्र मोदी व अमित शहा कोण आहेत?, असे आंदोलक दादी’ म्हणाली. इथे जीव धोक्यात घालून आंदोलन करण्यात आम्हाला आनंद आहे का?,’ असा सवाल एका महिलेने केला.