बदाऊन: उत्तर प्रदेशच्या दुगरय्या येथे विटंबना करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पुनर्स्थापनेनंतर नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. दोन दिवसांपूर्वी या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. पोलिसांनी याठिकाणी तात्काळ नवा पुतळा उभारला होता. मात्र, या पुतळ्याच्या भगव्या रंगाच्या शेरवानीवरून स्थानिक लोकांमध्ये संताप निर्माण झाला होता. त्यानंतर आता बसपाच्या कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी जाऊन परस्पर हा पुतळा निळ्या रंगाने रंगवला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तत्पूर्वी स्थानिकांकडून योगी सरकारच्या या 'भगवीकरणा'वर स्थानिकांकडून जोरदार टीका करण्यात आली. बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या शेरवानीचा रंग पाहून लोक संतप्त झाले आहेत. आतापर्यंत आपण नेहमीच गडद रंगाचा ब्लेझर आणि ट्राऊझर अशा विदेशी पेहरावातील बाबासाहेबांचे पुतळे पाहिले आहेत. त्यामुळे या पुतळ्याच्या शेरवानीचा भगवा रंग अनेकांना खटकत आहे. त्यामुळे हा पुतळा पुन्हा रंगवण्यात यावा, अशी मागणी आरक्षण बचाव संघर्ष समितीचे पदाधिकारी भारत सिंग जाटव यांनी केली होती. गेल्या काही दिवसांमध्ये दलित अत्याचारविरोधी (अॅट्रॉसिटी) कायद्यात झालेल्या बदलांमुळे दलित समाजात संतप्त वातावरण आहे. याशिवाय, गेल्या आठवड्यात योगी सरकारने डॉ. भीमराव आंबेडकर ही नाव लिहण्याची प्रचलित पद्धत बदलून त्यामध्ये 'रामजी' (डॉ. बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव) शब्द लिहण्याची अधिकृत सक्ती केली होती. या सगळ्यामुळे सध्या दलित समाजात सरकारविरोधी वातावरण निर्माण झाले आहे.
VIDEO: आंबेडकरांच्या भगव्या रंगातील पुतळ्याला बसपाच्या कार्यकर्त्यांनी दिला निळा रंग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 12:13 PM