वॉशिंग्टन : व्हाईट हाऊससमोर पाकिस्तानातील मुहाजीर निदर्शक आणि इतर पक्षांचे समर्थक समोरासमोर आल्यानंतर तणावाची चिन्हे दिसू लागताच पोलीस आणि गुप्तचर सेवेच्या कर्मचाऱ्यांनी दोन्ही गटांना एकमेकांपासून दूर केले. पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तणाव निवळला. फाळणीदरम्यान भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झालेल्या मुस्लिमांना पाकमध्ये मुहाजीर संबोधले जाते. मुहाजिरांची प्रमुख संघटना मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंटने (एमक्यूएम) व्हाईट हाऊससमोर शनिवारी निदर्शने आयोजित केली होती. एमक्यूएमचे पक्ष संमेलन वॉशिंग्टन डीसी येथे झाले. संघटनेचे प्रमुख अल्ताफ हुसैन यांनी व्हिडिओ लिंकद्वारे संमेलनाला संबोधित केले. हुसैन दोन दशकांपासून लंडनमध्ये विजनवासात आहेत. संमेलनानंतर निदर्शनांसाठी एमक्यूएमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने व्हाईट हाऊससमोर गोळा झाले. पाकिस्तानी लष्कराकडून कराचीत मुहाजिरांची कत्तल सुरू असून, ती रोखण्यासाठी आपण हस्तक्षेप करावा, असे आवाहन हुसैन आणि त्यांच्या समर्थकांनी अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांना केले. हुसैन यांना पाकिस्तानी माध्यमे फरारी संबोधतात. पाकिस्तानी लष्कराने एमक्यूएमच्या शेकडो कार्यकर्त्यांची थंड डोक्याने हत्या केली असून, लोकशाहीची जननी असलेल्या अमेरिकेने याची गंभीर दखल घ्यावी, असे हुसैन म्हणाले. एमक्यूएम हा पाकिस्तानातील एकमेव सुधारणावादी आणि धर्मनिरपेक्ष राजकीय पक्ष असल्याचे नमूद करून हुसैन यांनी मानवाधिकार उल्लंघनाच्या निगराणीसाठी कराचीला निरीक्षक पाठविण्याचे आवाहन ओबामा प्रशासनाला केले. अमेरिका इतर देशांतील मानवाधिकाराची स्थिती तपासण्यासाठी निरीक्षक पाठवीत असेल, तर त्याने पाकिस्तानातही निरीक्षक पाठवायला हवेत, असे ते म्हणाले. कराचीतील घडामोडींची वॉशिंग्टनमधील पाकिस्तानी तज्ज्ञांना जाणीव करून देण्यासाठी एमक्यूएमचे फारूक सत्ता आणि बाबर घौरी यासारखे नेते अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. घोषणा-प्रतिघोषणांनी परिसर दणाणून गेला- पाकमधील सत्ताधारी पाकिस्तान मुस्लिम लीग आणि इम्रान खान यांचा पक्ष तेहरिक- ए- इन्साफ या पक्षाचे कार्यकर्ते मुहाजिरांकडे देशद्रोही म्हणून पाहतात. मुहाजीर भारताच्या रॉचे हस्तक असल्याचाही त्यांचा आरोप आहे. - व्हॉईट हाऊससमोर एमक्यूएम कार्यकर्ते निदर्शने करीत असतानाच या दोन्ही पक्षांचे समर्थक तेथे पोहोचले आणि त्यांनी मुहाजिरांविरुद्ध घोषणबाजी सुरू केली. घोषणा- प्रतिघोषणांनी परिसर दणाणून गेला.
काश्मीरचे स्वप्न पाहणाऱ्या पाकला कराचीतूनच दणका
By admin | Published: July 27, 2016 1:56 AM