ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या सैराट या चित्रपटात एकमेकांवर प्रेमकरणाऱ्या आर्ची आणि परशाचा क्रूरपणे बळी घेण्यात आल्याचे तुम्ही पाहिलेच असेल. आता या संदर्भातील धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशभरात प्रेमप्रकरणांमुळे दहशतवादापेक्षा सहा पट बळी जात असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. 2001 ते 2015 या 15 वर्षांमध्ये देशात प्रेमप्रकरणांमधून 38 हजार 585 जणांचा बळी घेण्यात आला आहे. सरासरी आकडेवारीनुसार देशात प्रेमप्रकरणातून दररोज 7 हत्या, 14 आत्महत्या आणि 47 अपहरणासारखे गंभीर गुन्हे घडत आहेत.
सातत्याने दहशतवादाच्या छायेत असलेल्या भारतामध्ये दरवर्षी शेकडो नागरिक दहशतवादी कारवायांत मृत्युमुखी पडत असतात. पण प्रेमप्रकणातून होणारे मृत्यूचे प्रमाण सहापट अधिक आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित झाले आहे. या वृतानुसार 2001 ते 2015 या 15 वर्षांच्या काळात प्रेमप्रकरणातून 38 हजार 585 बळी घेण्यात आले आहेत. तर याच काळात प्रेमप्रकरणातील अपयश आणि यासंदर्भातील अन्य कारणांमुळे 79 हजार 189 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र या 15 वर्षात दहशतवादी हल्ल्यांमध्ये 20 हजार जणांना मरण आले होते.
आकडेवारीनुसार आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि मध्य प्रदेशमध्ये प्रेमप्रकरणातून होणाऱ्या हत्यांचे प्रमाण अधिक आहे. या सर्व राज्यात गेल्या 15 वर्षांत 3 हजार हून अधिक हत्या प्रेमप्रकरणातून झाल्या आहेत. तसेच देशभरात या काळात 2.6 लाख अपहरणाचे गुन्हेही नोंदवले गेले आहेत. यात महिलांचे अपहरण हे मुख्यत्वेकरून विवाहाच्या उद्देशाने करण्यात आल्याचे समोर आले आहे. तर प्रेमप्रकणामधून होणाऱ्या आत्महत्यांमध्ये पश्चिम बंगाल आघाडीवर आहे. तेथे 15 वर्षात 15 हजार जणांनी आत्महत्या केल्या आहेत.