ऑनलाइन लोकमत -
बंगळुरु, दि. 12 - हरियाणामधील दांपत्य दलजिंदर कौर आणि मोहिंदर सिंग गिल पुत्रप्राप्ती झाल्याचा आनंद साजरा करत आहेत. मात्र बंगळुरुमधील आयव्हीएफ ( In Vitro Fertilisation) एक्स्पर्ट आणि गायनाकॉलॉजिस्ट यांनी या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून हे नितीला धरुन नसल्याचं म्हटलं आहे. टेस्ट ट्युब बेबीच्या सहाय्याने त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सध्या दलजिंदर कौर यांचं वय 72 तर मोहिंदर सिंग गिल यांचं वय 79 आहे.
इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रजिस्ट्रीच्या नियमांनुसार आयव्हीएफच्या सहाय्याने आई-वडील होणा-या दांपत्याचं एकत्रित वय 100 हून जास्त नसलं पाहिजे. गिल दांपत्यांचं एकत्रित वय 150 हून जास्त आहे, 'दलजिंदर कौर यांच्या मेनोपॉजलादेखील 20 वर्ष होऊन गेली आहेत. या वयात अंडाशयात अंडी तयार होणं अशक्य आहे. तसंच 79 व्या वर्षी माणसाच्या शुक्रजंतूमधील गुणवत्तादेखील कमी झालेली असते. यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असून कोणत्याही वर्षी बाळाला जन्म दिला जाऊ शकतो असा चुकीचा संदेश जात आहे. आम्ही याचा निषेध करतो', अस डॉ बिना वासन यांनी म्हटलं आहे.
यामुळे दांपत्यांमध्ये अवास्तव अपेक्षा निर्माण होत असल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे. 'या बातमीने हेडलाईनमध्ये जागा मिळवली असेल, पण आपण ख-या जगात राहतो. आयव्हीएफच्या सहाय्याने पालक होणा-या दांपत्याला काऊंसिलिंगची गरज आहे. वय जास्त झालं असल्याने म्हातारपणी ह्रद्याचा तसंच हाडासंबंधी समस्या निर्माण होऊ शकतात ज्याचा परिणाम बाळावर होऊ शकतो', अशी भीती डॉ मनिषा सिंग यांनी व्यक्त केली आहे.
'डॉक्टर म्हणून आपण त्या मुलाबद्दलदेखील विचार केला पाहिजे. या वयात पालकांना आपल्या वाढत्या वयामुळे मुलांशी संपर्क साधणं कठीण होऊन जातं', असं मत गुणशीला हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ देविका यांनी व्यक्त केलं आहे.
IVF / टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय ?
IVF (In Vitro Fertilization) म्हणजेचं टेस्ट ट्यूब बेबीमध्ये स्त्रीला पाळीच्या गोळ्या दिल्या जातात आणि पाळीच्या 20 दिवसांपासून इंजेक्शन सुरु होतात. जी रोज 20-25 दिवस घ्यावी लागतात. मध्ये एक पाळी येते आणि दुस-या दिवसापासून अंडाशयात अंडी तयार होण्यासाठी वेगळी इंजेक्शन सुरु करतात. पाळीच्या 9 दिवसांपासून Folicular Study करुन अंडाशयातील वाढ 18 मिमी पेक्षा जास्त झाली की इंजेक्शन देऊन 36 तासांनी तयार झालेली अंडी अंडाशयातून बाहेर काढतात. त्यासाठी सोनोग्राफीचा उपयोग केला जातो. पेशंटच्या पोटावर शस्त्रक्रिया केली जात नाही. बाहेर काढलेली अंडी आणि पतीचे शुक्रजंतू यांचे शरीराच्या बाहेर मिलन घडवून आणतात आणि शरीराबाहेर गर्भ तयार केला जातो. हा गर्भ इंक्युबेटरमध्ये 2 ते 3 दिवस वाढवून नंतर पत्नीच्या गर्भ पिशवीमध्ये सोडला जातो. हा गर्भ गर्भपिशवीत रुजतो. 9 महिने त्याची वाढ होते आणि नंतर बाळ जन्माला येते.