नरेंद्र मोदी, सीतारामन यांच्याविरुद्ध हक्कभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 03:47 AM2018-07-25T03:47:19+5:302018-07-25T03:48:25+5:30
राफेल लढाऊ विमानांच्या किंमतीबाबत सभागृहाची हेतूपुरस्सर दिशाभूल केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांच्याविरुद्ध हक्कभंगाची नोटीस
नवी दिल्ली : फ्रान्सकडून खरेदी करायच्या राफेल लढाऊ विमानांच्या किंमतीबाबत सभागृहाची हेतूपुरस्सर दिशाभूल केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांच्याविरुद्ध हक्कभंगाची नोटीस काँग्रेस पक्षाने मंगळवारी दिली.
काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते मल्लिकार्जून खरगे यांनी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना पत्र लिहून ही नोटीस दिली व ती स्वीकारून पुढील कारवाईसाठी हक्कभंग समितीकडे सोपवावी, अशी विनंती केली.
मोदी सरकारने राफेल विमानांची किंमत चारपट वाढवून दिली आहे, असा काँग्रेसचा आरोप असून सरकारने विमानांची किंमत जाहीर करावी, अशी पक्ष सातत्याने मागणी करत आहे. लोकसभेत अविश्वास ठरावावरील चर्चेतही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ही मागणी केली होती. मात्र मोदी व सितारामन यांनी फ्रान्ससोबत झालेल्या करारातील गोपनीयतेच्या कलमाचे कारण सांगून किंमत जाहीर करता येणार नाही, असे उत्तर दिले होते. मात्र वस्तुत: त्या करारातील गोपनीयतेचे कलम विमानांच्या किंमतीला लागू नाही. तरीही मोदींनी त्या कलमाचा चुकीचा संदर्भ देऊन दिशाभूल केली, असा आरोप खरगे यांनी पत्रात केला आहे.