ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 10 - डेन्मार्कच्या पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या पाचही गुन्हेगारांना तीस हजारी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने पाचही आरोपींना सामूहिक बलात्कार, चोरी आणि अपहरणाच्या आरोपाखाली दोषी ठरवलं होतं. महेंद्र उर्फ गंजा, मोहम्मद राजा, राजू, अर्जून आणि राजू चक्का अशी आरोपींची नावे आहेत. 14 जानेवारी 2014 मध्ये चाकूचा धाक दाखवत डेन्मार्क महिलेवर बलात्कार करुन तिला लूटण्यात आलं होतं.
या खटल्यातील एक आरोपी श्यामलाल (वय 56) याचा यावर्षी फेब्रुवारीमध्ये तिहार कारागृहात मृत्यू झाला होता तर आणखी तीन आरोपी गुन्हा घडला तेव्हा अल्पवयीन होते. त्यांच्याविरुद्ध बालगुन्हेगार न्यायमंडळासमोर चौकशी सुरू आहे.
नवी दिल्ली रेल्वेस्थानकाजवळ जानेवारी 2014 मध्ये 52 वर्षांच्या डेन्मार्क महिला पर्यटकाने तिच्या हॉटेलचा पत्ता विचारला असता नऊ जणांनी चाकूच्या धाकाने तिला जवळच असलेल्या विभागीय रेल्वे अधिकारी क्लबनजीक निर्मनुष्य जागेत नेले होते. तेथे तिच्याकडील ऐवज लुटून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता.
या खटल्यात सरकारी पक्षाने 27 साक्षीदार तपासले. मात्र, आरोपींना कोणतेही पुरावे देता आले नाहीत. या घटनेच्या आदल्या रात्री आपण एका वेश्येला पैसे देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले होते. त्यामुळे या घटनेशी आपला काहीही संबंध नाही, असे म्हणणे आरोपींनी मांडले होते. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रमेशकुमार यांनी या पाच जणांना दोषी ठरवले आहे. आज शुक्रवारी न्यायालयाने पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.