मुंबई, दि. 15 - एकीकडे देशात बुलेट ट्रेन सुरु करण्याची चर्चा सुरु असताना दुसरीकडे रेल्वेचा दर्जा मात्र अजिबात सुधारताना दिसत नाहीये. ब्रेक फेल झालेले असतानाही दरभंगा एक्स्प्रेस 350 किमीपर्यंत चालवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी दरभंगाहून मुंबईला येणा-या ट्रेनमधील 21 पैकी 19 डब्यांचा ब्रेक फेल झाला होता. यानंतरही कोणती दुरुस्ती न करता वाराणसीपर्यंत एक्स्प्रेस चालवण्यात आली. यावेळी ट्रेनमधून 2000 प्रवासी प्रवास करत होते. प्रवाशांचा जीव धोक्यात घालून चालवण्यात आलेल्या याच एक्स्प्रेसचे ब्रेक गुरुवारी परतीच्या प्रवासावेळी पुन्हा एकदा फेल झाले होते.
रेल्वे बोर्डाचे सदस्य आरएल गुप्ता यांनी पूर्व मध्य रेल्वेचे मुख्य यांत्रिक अभियंत्यांना पत्र लिहून ब्रेक फेल झाल्यासंबंधी माहिती दिली होती. मात्र अधिकारी असं कोणतंही पत्र मिळालं नसल्याचा दावा करत आहेत.
गेल्या काही दिवसांत रेल्वे अपघातांची मालिका झाली असतानाही रेल्वे मात्र कोणताही धडा शिकायला तयार नसल्याचं दिसत आहे. गेल्याच महिन्यात उत्तर प्रदेशात रेल्वे अपघात होऊन 23 जणांचा मृत्यू झाला होता. याशिवायदेखील अनेक अपघात झाले होते. त्यातच मंगळवारी 2000 प्रवाशांना घेऊन मुंबईकडे येत असलेली दरभंगा एक्स्प्रेस ब्रेक फेल झाले असतानाही 350 किमीपर्यंत पळवण्यात आली.
13 सप्टेंबर रोजी रेल्वे बोर्डाचे सदस्य आरएल गुप्ता यांनी मुख्य यांत्रिक अभियंत्यांना लिहिलेल्या पत्रात, मुंबईकडे जाणा-या दरभंगा - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसच्या ब्रेकमध्ये पॉवर नसल्याचा उल्लेख केला होता. हे अत्यंत गंभीर असून, मोठी दुर्घटना होऊ शकते असंही पत्रातून सांगण्यात आलं होतं.
उत्तर केंद्रीय रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी राजेश कुमार यांचं म्हणणं आहे की, 'रेल्वे बोर्डाकडून आलेल्या कोणत्याही पत्राबद्दल मला कल्पना नाही. माझ्या माहितीनुसार, जेव्हा एक्स्प्रेस दरभंगाहून रवाना झाली असेल तेव्हा रस्त्यात ब्रेक फेल झाले असावेत. जेव्हा या बिघाडाची माहिती मिळाली तेव्हा सोनपूर स्थानकावर तांत्रिक विभागाने तपास केला. मात्र त्यावेळी काहीच बिघाड नसल्याचं लक्षात आलं. ट्रेनमध्ये काही बिघाड आहे का, हे पाहण्यासाठी त्यांच्यातील एकाने छपरापर्यंत प्रवासही केला. ब्रेकमध्ये पॉवर कमी असल्याचं लक्षात आलं तेव्हा छपरा स्थानकावर पुन्हा पाहणी करण्यात आली'.
राजेश कुमार यांनी पुढे बोलताना सांगितलं की, 'बिघाड अत्यंत साधा असल्याने टेक्निकल एक्स्पर्टने दुरुस्ती केली. वाराणसीत पुन्हा तपासणी करण्यात आली. जेव्हा टेक्निकल एक्सपर्टची खात्री पडली तेव्हा ट्रेन रवाना करण्यात आली. प्रवाशांच्या सुरक्षेला कोणताही धोका नाही याची काळजी घेतली गेली होती. सध्या या प्रकरणाचा तपास केला जात असून, कारणांचाही शोध घेतला जात आहे'.