बिहारच्या दरभंगामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात रुग्णालयाच्या बिलासमोर आई-वडिलांचा नाईलाज झाला आहे. मुलीच्या उपचाराच्या वेळी रुग्णालयाचं झालेलं बिल भरण्यासाठी या गरीब आई-वडिलांकडे पैसे नव्हते. यामुळे ते आपल्या मुलीला तिथेच ठेवून गुपचूप निघून गेल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मधुबनी जिल्ह्यातील छातापूर गावात राहणारं एक कुटुंब आपल्या नवजात बाळावर दरभंगा शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार करत होतं.
रुग्णालय प्रशासनाने मोठ्या रकमेचं बिल कुटुंबीयांना दिल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. गरिबीमुळे मुलीची आई आणि नातेवाईक तिला रुग्णालयातच सोडून निघून गेले. जेव्हा एखादी आई आपल्या मुलाला अशा परिस्थितीत सोडून जाते तेव्हा त्या आईची काय मजबुरी असावी हे आपण समजू शकतो. आई आणि तिच्या मुलीच्या प्रेमादरम्यान त्या कुटुंबाची गरिबी आणि पैशाची कमतरता हे मोठं संकट आलं. याच कारणाने त्यांना एकमेकांपासून वेगळं केलं.
बाळाच्या कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात सोडल्याचं रुग्णालय प्रशासनाला कळताच रुग्णालय प्रशासनाने तातडीने बालकल्याण विभागाचे प्रमुख वीरेंद्र कुमार झा यांना माहिती दिली. त्यानंतर दरभंगा आणि मधुबनी जिल्ह्यातील चाइल्ड लाइनशी संपर्क साधला. कुटुंबीयांशी संपर्क साधल्यानंतर त्या कुटुंबाला दरभंगा येथे बोलावण्यात आले. त्यानंतर रुग्णालयातील उपचारांची सर्व बिले माफ करण्यात आली. वीरेंद्र कुमार झा यांचं म्हणणं आहे की, रुग्णालय प्रशासनाने पीडित कुटुंबीयांना 1.75 लाखांचे बिल सुपूर्द केले होते. ज्यामध्ये या कुटुंबाने 70000 रुपये जमा केले होते.
पुढील रक्कम जमा करण्याच्या स्थितीत कुटुंबीय नव्हते, या कारणास्तव ते बाळाला रुग्णालयात सोडून तेथून निघून गेले. बालकाशी संबंधित माहिती बालकल्याण समितीला देण्यात आली आणि पुढील कार्यवाही करण्याचे आवाहन करण्यात आले. बालकल्याण समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुमार झा यांनी रुग्णालयात येऊन डॉक्टरांकडून माहिती घेतली. बाळाला पाहिल्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले.
बाळाच्या पालकांनी सांगितलं की ते खूप गरीब आहेत आणि हॉस्पिटलचा खर्च करू शकत नाहीत. 26 डिसेंबर रोजी मुलीचे कुटुंबीय दरभंगा येथे आले आणि त्यांनी चाइल्ड लाईन दरभंगा यांना सोबत घेऊन रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी सांगितलं की बाळाला अजून काही दिवस उपचारांची गरज आहे. पुढील उपचारासाठी तिला डीएमसीएचमध्ये पाठवण्यात आलं. तिला बालरोग विभागात दाखल केलं असून, तिथे उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"