कोलकाता: तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारला थेट आव्हान दिलं आहे. कोलकात्यात भव्य रॅली काढून बॅनर्जींनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सरकारला लक्ष्य केलं. राज्यात नवा कायदा लागू करणार नाही. केंद्रानं माझं सरकार बरखास्त करण्याची हिंमत करुन दाखवावी, असं खुलं आव्हान ममता यांनी दिलं. ममता बॅनर्जींनी काढलेल्या रॅलीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. तुम्हाला माझं सरकार बरखास्त करायचं असेल, तर खुशाल बरखास्त करा. पण मी बंगालमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा ममता बॅनर्जींनी घेतला आहे. त्यांना वाटतं ममता बॅनर्जी एकट्या आहेत. मात्र आता माझ्यासोबत कित्येक जण आहेत. तुमचा हेतू चांगला असेल, तर जनता तुमच्या सोबत असते, असं त्या जनसभेला संबोधित करताना म्हणाल्या. ही धर्मासाठीची लढाई नाही, तर हक्कांसाठी चाललेला संघर्ष असल्याचं त्यांनी म्हटलं.
CAA : माझं सरकार बरखास्त करण्याचं धाडस करुनच दाखवा; ममता बॅनर्जींचं थेट आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 6:03 PM