लखनऊ, दि. 9- बलात्कार प्रकरणी शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा राम रहिमच्या डेराशी संबधीत असलेल्या अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. शुक्रवारी झालेल्या सर्च ऑपरेशनमध्ये डेरातून अनेक मौल्यवान गोष्टी सापडल्या तसंच डेरामध्ये राम रहिमचं प्लास्टिकचं चलन असल्याचंही समोर आलं होतं. राम रहीमच्या या डेरा प्रकरणी आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. डेरा मुख्यालयातून कोणत्याही कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता, मृत्यू प्रमाणपत्राशिवाय मृतदेह उत्तर प्रदेशातील वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात आल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. द टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या एका समितीने लखनऊतील जीसीआरजी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सची तपासणी केली होती. त्यातून ही बाब समोर आली आहे. राम रहिमच्या डेराकडून जानेवारी २०१७ ते ऑगस्ट २०१७ पर्यंत १४ शवदान करण्यात आले. पण हे 14 शवदान करताना कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आलेली नसल्याती बाब समोर आली आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आणि संशोधनासाठी मृतदेहाची आवश्यकता असते. कोणत्याही खासगी वैद्यकीय संस्थेत मृतदेह देताना डॉक्टरांनी किंवा हॉस्पिटलने दिलेलं मृत्यू प्रमाणपत्र आणि कुटुंबाचं संमती पत्र आवश्यक असतं. तसंच बेवारस मृतदेहाचं शवविच्छेदन करणं आवश्यक असते. वैद्यकीय महाविद्यालयाला शव ताब्यात घेण्यासाठी पोलिसांची संमती घेणंसुद्धा बंधनकारक असतं. डेराकडून वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आलेल्या मृतदेहाच्या बाबतीत अशी कोणतीच प्रक्रिया करण्यात आली नव्हती, अशीही माहिती समोर आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या चौकशी समितीने १९ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेश सरकारला याप्रकाराची माहिती दिली असल्याची एक कॉपी 'टाईम्स ऑफ इंडिया'कडे आहे. यात कोणत्याही कागदपत्रांशिवाय, मृत्यू प्रमाणपत्र नसताना मृतदेह स्वीकारणं गंभीर बाब असल्याचं म्हंटलं आहे.
बाबा राम रहिम याच्या अनुयायांकडून मृतदेह देण्यात आले होते. डेरा सच्चा सौदाच्या अनुयायांकडून अशाप्रकारे इतर वैद्यकीय महाविद्यालयांनासुद्धा मृतदेह देण्यात आले आहेत, असं जीसीआरजी वैद्यकीय महाविद्यालय संस्थेचे व्यवस्थापन सदस्य ओंकार यादव यांनी सांगितलं आहे. आमच्याकडे असलेल्या १४ मृतदेहांच्या कुटुंबीयांनी प्रतिज्ञापत्र दिलं असल्याची माहिती ओंकार यादव यांनी दिली आहे.
दरम्यान, याप्रकरणी राज्य आरोग्य शिक्षण विभागाशी संपर्क साधण्यात येणार असून याबाबतच्या कायदेशीर प्रक्रियांची माहिती घेतली जाईल. या संपूर्ण प्रकरणात जर नियमांचं पालन झाल नसल्याचं आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं लखनऊचे एसएसपी दीपक कुमार यांनी सांगितलं आहे.