सहारनपूरः उत्तर प्रदेशमधल्या सहारनपूरमध्ये इस्लामिक शिक्षण देणारी संस्था दारुल उलूम देवबंदनं ईदच्या पार्श्वभूमीवर फतवा जारी केला आहे. ईदच्या दिवशी एकमेकांची गळाभेट घेणं हे इस्लामच्या विरोधात आहे. दारूल उलूम देवबंदचा फतवा आता चर्चेचा विषय ठरला आहे. दारूल उलूम देवबंदच्या खंडपीठाला पाकिस्तानच्या एका व्यक्तीनं प्रश्न विचारला की, ईदच्या दिवशी गळाभेट घेणं हे मोहम्मद साहेबांच्या तत्त्वात बसते काय, त्यावर देवबंदनं ते त्यांच्या तत्त्वात बसत नसल्याचं सांगितलं आहे.तसेच जर कोणी गळाभेट घेण्यासाठी आले तर काय करावे, त्यावर देवबंदनं सांगितलं की, जर असं कोणी करत असल्यास त्याला विनम्रतेनं थांबवावं. परंतु बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या व्यक्तीचा गळाभेट घेण्यास काहीच हरकत असल्याचंही देवबंदनं स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही दारूल उलूम देवबंदनं असाच फतवा काढला होता. मोबाइलवर कोणत्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करणं संस्थेकडून गुन्हा ठरवण्यात आले आहे. मोबाइलवर आवाज रेकॉर्ड करणं सर्वसामान्य गोष्ट आहे आणि कित्येक मोबाइल सेटमध्ये ऑटो रेकॉर्डिंगचीदेखील व्यवस्था असते.आपला आवाज रेकॉर्ड होतोय ही बाब संवाद साधणाऱ्या व्यक्तीच्या लक्षातही येत नाही. दारूल उलूमच्या फतवा विभागाच्या खंडपीठातील मुफ्ती ए कराम यांनी यावर उत्तर देताना सांगितले होते की, इस्लाम धर्मात आपापसातील संभाषण ही त्यांची खासगी बाब असते, असे मानले जाते. इस्लाममध्ये अशा संभाषणांचे रेकॉर्डिंग करून अन्य लोकांना ऐकवणे किंवा त्यांची खिल्ली उडवणे चुकीचे मानले जाते. त्यामुळे परवानगीशिवाय कॉल रेकॉर्ड करणं उचित नसल्याचेही त्यांनी सांगितले होते.
ईदच्या दिवशी गळाभेट घेणं इस्लाममध्ये निषिद्ध, दारुल उलूम देवबंदचा फतवा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 1:07 PM