सहारनपूर - दारुल उलूम देवबंदनं मुस्लिम महिलांसाठी आणखी एक अजब फतवा जारी केला आहे. दारुल उलूमचे मुफ्ती इशरार गौरा यांनी म्हटलंय की, महिलांनी आपल्या नखांना नेल पॉलिश लावण्याऐवजी मेहंदीचा वापर करायला पाहिजे. वॅक्सिंग, शेविंग, परपुरुषाकडून मेहंदी लावून घेणं यांसारख्या अनेक अजब फतव्यांनंतर हा नवीन फतवा जारी केला आहे. यावर मुफ्ती इशारार गौरा यांनी असा युक्तिवाद केला आहे की, मुस्लिम महिलांनी नेल पॉलिशचा वापर करू नये. कारण हा प्रकार इस्लाममध्ये अमान्य आहे. नेल पॉलिशऐवजी महिलांनी नखांना मेहंदी लावावी. यापूर्वीही, देवबंदनं अशा प्रकारे अनेक वादग्रस्त फतवे जारी केले आहेत.
(केसांचा टोप घालून नमाजपठण करु नका - देवबंद)
यापूर्वीही जारी करण्यात आलेले काही फतवे
- कृत्रिम केसांचा टोप लावून नमाज पठणाला बसू नका. यामुळे नमाज पठण अपूर्ण राहते. नमाज पठणापूर्वी हात-पाय, चेहरा धुणे आणि डोक्यावर पाणी घेणे आवश्यक आहे. पण केसाच्या टोपामुळे पाणी डोक्याच्या त्वचेपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे शरीर अशुद्ध राहते, असे देवबंदचे प्रवक्ते अश्रफ उस्मानी यांनी सांगितले होते.
- पुरुष फुटबॉल खेळाचे सामने मुस्लिम महिलांनी पाहणं हराम
मुस्लिम महिलांनी पुरुषांना फुटबॉल खेळताना पाहणं हे इस्लामच्या विरोधात आहे. मुस्लिम महिलांनी पुरुषांना फुटबॉल खेळताना पाहू नये, असे देवबंदचे मुफ्ती अतहर कासमी म्हणाले होते. उघड्या गुडघ्यांनी फुटबॉल खेळणा-या पुरुषांना पाहणं हे इस्लामच्या नियमांच्या विरोधात आहे. मुस्लिम महिलांसाठी हे हराम आहे. दारुल उलूम देवबंदच्या मुफ्तींनी महिलांना टीव्हीवर फुटबॉलचे सामने पाहण्यास परवानगी देणा-या नव-यांनाही फटकारलं होते.
- लोकांची दाढी करणे हे इस्लाम विरोधी
लोकांचे दाढी करणे हे इस्लाम विरोधी कृत्य असल्याचा फतवा काढला होता. सलूनच्या दुकानात काम करणा-या मुसलमानांनी आता नवीन रोजगार शोधायला हवा असे मतही दारुल देवबंदने मांडले होते. मोहम्मद इर्शाद व मोहम्मद फुरकान यांनी मदरसादारुल उलूमला या संदर्भात फतवा काढावी अशी मागणी केली होती. शरियानुसार लोकांची दाढी करणे किंवा त्यांच्या दाढीचे केस कापणे हे इस्लाम विरोधी कृत्य असल्याचे या फतव्यात म्हटले आहे.