नवी दिल्ली - मुस्लिम महिलांनी दिवाळीदरम्यान वाराणसीत रामाची आरती केल्यानंतर 'दारुल उलुम देवबंद' या संस्थेनं यावर टीका करत त्यांच्यासाठी भलताच फर्मान काढला आहे. ''अल्लाशिवाय इतर देवांची पूजा केली तर संबंधित व्यक्ती मुस्लिम होऊ शकत नाही. या महिलांनी अल्लाची माफी मागावी. तसंच कलमा पठण केल्यानंतरच त्यांना माफ करण्यात यावे'', असा फतवा या संस्थेनं काढला आहे.
वाराणसीमध्ये दिवाळीनिमित्त काही मुस्लिम महिलांनी श्रीरामाच्या प्रतिमेची आरती केली होती. यानंतर या महिलांना बहिष्कृत केल्याचे दारुल उलुम देवबंदने स्पष्ट केले. मात्र आरती करणाऱ्या मुस्लिम महिलांनी याबाबत वेगळीच भूमिका मांडली आहे. अयोध्या हे एक धार्मिक स्थळ आहे, इथे श्रीराम वास्तव्य करतात. ते आपले पूर्वज आहेत. आपले धर्म आणि नावे बदलू शकतात पण पूर्वज नाही, असे प्रतिक्रिया नाजनीन अन्सारी या महिलेने दिली आहे. शिवाय, श्रीरामाची पूजा केली तर हिंदू आणि मुस्लिम समाजात असलेली तेढ कमी होण्यास नक्कीच मदत होईल, नाजनीन यांनी म्हटले.
दारुल उलुम देवबंदनं या प्रकारावर नाराजी व्यक्त करत अल्लाशिवाय इतर देवांची उपासना करणारे मुस्लिम होऊच शकत नाहीत. या महिलांनी अल्लाची माफी मागावी, असा आदेश देवबंदनं दिला आहे. दिवाळी असल्याने ‘मुस्लिम महिला फाऊंडेशन’ आणि ‘विशाल भारत संस्थान’ यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.