मुंबई : बँक खात्याला पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी लिंक धाडून झारखंडमधील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकानेच साडेतीन हजार बँक खातेदारांच्या खात्यावर डल्ला मारण्याच्या तयारीत असल्याची माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी मंजित कुमार आर्या (३१) याला अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दोन नामांकित बँकेच्या जवळपास ७ लाख ६५० बँक खातेदारांची गोपनीय माहिती त्याच्याकडे सापडली.
माटुंगा परिसरात राहणारे सेवानिवृत्त वसंत गांगजी छेडा (६४) यांना गेल्या वर्षी २५ डिसेंबर रोजी बँकेतील कर्मचारी असल्याचे भासवून बँकेला पॅन कार्ड अपडेट न केल्यास बँक खाते ब्लॉक होणार असल्याचे सांगितले. त्यांनी विश्वास ठेवून कॉलधारकाने सांगितल्याप्रमाणे त्यांच्या गोपनीय माहितीच्या आधारे खात्यातील १ लाख ९ हजार रुपयांवर हात साफ केला. याप्रकरणी माटुंगा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला.
गुन्ह्यात वापरलेल्या मोबाइलच्या आधारे पोलिसांनी बँक खात्याची माहिती मिळवली. त्यानुसार दिल्ली व झारखंड पथक रवाना होऊन या गुन्ह्यात ३ आरोपींना अटक केली होती. आरोपींच्या चौकशीतून गुन्ह्यातील मुख्य आरोपीत मंजीत असल्याचे निष्पन्न होताच पथकाने झारखंडमधून अटक केली. त्याच्याकडून मोबाइल, सिमकार्ड, लॅपटॉप जप्त केला आहे. त्याच्या मोबाइलमधून जवळपास ३ हजार ६०० लोकांना लिंक पाठवल्याचे समोर आले. त्यामुळे ही गोपनीय माहिती कशी लीक झाली? यामागे बँक कर्मचाऱ्याचा समावेश आहे का? याबाबत माटुंगा पोलिस अधिक तपास करत आहेत.
गुन्हेगारांनाही प्रशिक्षण मंजित विरोधात यापूर्वी झारखंडच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. त्यात, तो जमिनावर बाहेर होता. झारखंड जिल्हा परिषद हायस्कूल देवघर येथे मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहे. नोकरीबरोबरच तो सायबर गुन्हेगारांना लिंकद्वारे फसवणुकीचे शिक्षण देणे, तसेच सिम कार्ड व बँक अकाउंट पुरविण्याचे काम करत असल्याचेही समोर आले आहे.