नवी दिल्ली - एअर इंडियाने आपल्या प्रवाशांचा खासगी डेटा चोरी गेल्याचं मान्य केलं आहे. एअर इंडियाच्या मतानुसार, 26 ऑगस्ट 2011 पासून ते 3 फेब्रुवारी 2021 या कालावधीत प्रवाशांची जन्मतारीख, त्यांच्या संपर्काचा पत्ता, नाव, पासपोर्ट आणि तिकीटासंदर्भातील माहिती लीक झाली आहे. तसेच, स्टार एलियंस आणि एअर इंडियाचा फ्रिक्वेंट फायर डेटा व क्रेडिट कार्डही ब्रीच झाले आहे. पासवर्डला गोपनीय ठेवण्यात आल्याचे एअर इंडियाने सांगितलं आहे.
क्रेडिट कार्ड डेटासंबंधित सीवीवी आणि सीवीसी नंबर्स डेटा प्रोसेसरकडून रेकॉर्ड करण्यात आला नसल्याचे एअर इंडियाने स्पष्ट केले आहे. तसेच, या प्रोसेसरवर कुठल्याही प्रकारचा चुकीची कृती दिसून आली नाही. या सायबर हल्ल्यात जगभरातील एअरलाईन्सचा डेटा लीक झाला आहे. एकट्या एअर इंडियाच्या 45 लाख प्रवाशांची गोपनीय माहिती लीक झाल्याचंही एअर इंडियाने म्हटलं आहे.
लीक झालेल्या डेटामध्ये क्रेडीट कार्डचाही समावेश आहे, ज्या प्रवाशांचा डेटा लीक झाला आहे, त्या प्रवाशांना एका जाहिरातीद्वार सूचनाही देण्यात आली आहे. एअर इंडियाचा SITA PSS सर्वर, जो उड्डाण भरणाऱ्या प्रवाशांच्या व्यक्तीगत माहितीला स्टोअर आणि प्रोसेस करतो, त्यावरच हा सायबर हल्ला झाल्याचे एअर इंडियाने म्हटलंय.
एअर इंडियाने प्रवाशांना ई-मेलद्वारे माहिती दिली आहे. त्यामध्ये, 19 मार्च रोजी एअरलाईन्स प्रशासनाने प्रवाशांना माहिती दिली असून संशयास्पद स्थितीत पासवर्ड बदलण्याच्या सूचनाही केल्या आहेत.