लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : हॅकर्सनी जगभरातील ४८७ दशलक्ष म्हणजेच २५ टक्के व्हॉट्सॲप वापरकर्त्यांचा डेटा हॅक करून तो इंटरनेटवर विक्रीसाठी ठेवला आहे. यातील ६१.६२ लाख फोन नंबर भारतीयांचे आहेत. या डेटात फोन नंबर, देशाचे नाव व एरिया कोडचा समावेश आहे.
१६ नोव्हेंबर रोजी विक्रीसाठी ठेवलेल्या डेटामध्ये ८४ देशांतील नागरिकांची माहिती आहे. या डेटाच्या खाली हॅकर्सनी एक संदेश लिहिला आहे.‘आज मी या व्हॉट्सॲप वापरकर्त्यांचा डेटा बेस विकत आहे. हा २०२२ चा सर्वात ताजा डेटा आहे. म्हणजेच तुम्ही तो विकत घेतल्यास, तुम्हाला नवीन सक्रिय मोबाइल वापरकर्ते मिळतील,’ असे या संदेशात म्हटले आहे. यामुळे नागरिकांच्या गोपनीय माहितीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
फसवणुकीचा धोकाहॅकिंगचा सर्वात मोठा धोका फिशिंग आणि फसवणुकीचा आहे. व्हॉट्सॲप आणि बँकिंग सेवांशी संबंधित क्रमांक एकच असलेले लोक याला मोठ्या प्रमाणावर बळी पडू शकतात. दोन्ही कामांसाठी एकच नंबर वापरला जात आहे. याशिवाय या क्रमांकांद्वारे वापरकर्त्यांच्या ओळखीचा दुरुपयोग करून दुसऱ्याची फसवणूक केली जाऊ शकते.
इजिप्तमध्ये सर्वाधिक, भारत २५ व्या क्रमांकावर डेटा हॅक झालेल्या ८४ देशांच्या वापरकर्त्यांपैकी सर्वाधिक ४.४८ कोटी इजिप्तमधील आहेत. यानंतर इटलीचे ३.५६ कोटी, अमेरिकेचे ३.२३ कोटी, सौदी अरेबियाचे २.८८ कोटी, तर फ्रान्समधील १.९८ कोटी वापरकर्ते आहेत. हॅक झालेल्या वापरकर्त्यांच्या यादीत भारत २५ व्या क्रमांकावर आहे.
टाळण्यासाठी सेटिंग्जमध्ये बदल कराअनोळखी व्यक्ती हे नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह करून तुमचा प्रोफाईल फोटो, स्टेट्स, माहिती, ऑनलाइन असण्याची माहिती, प्रोफाईल नाव इत्यादी पाहू शकतो. हे टाळण्यासाठी तुम्ही व्हॉट्सॲपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन ‘कॉन्टॅक्ट ओन्ली’मध्ये प्रायव्हसी बदलू शकता. याद्वारे, जे लोक तुमच्या संपर्कात आहेत तेच उल्लेख केलेल्या गोष्टी पाहू शकतील.