'डेटा सिस्टीम मजबूत, काहीच चूक होऊ शकत नाही'; फेरफारीच्या आरोपांना निवडणूक आयुक्तांचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 10:47 IST2025-02-13T10:43:21+5:302025-02-13T10:47:39+5:30
ECI News: निवडणुकीच्या डेटामध्ये फेरफार केल्याच्या आरोपांनी जोर धरला असून, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

'डेटा सिस्टीम मजबूत, काहीच चूक होऊ शकत नाही'; फेरफारीच्या आरोपांना निवडणूक आयुक्तांचे उत्तर
दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा निवडणूक प्रणाली आणि डेटामध्ये फेरफार केल्याचे आरोप होऊ लागले आहेत. निवडणुकीच्या डेटामध्ये फेरफार करण्यात आल्याचे विरोधकांचे आरोप केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी फेटाळून लावले आहेत. निवडणूक डेटा प्रणाली सुरक्षित आहे. त्यात काहीच चूक होऊ शकत नाही, असे राजीव कुमार म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लोकसभा २०२४ अॅटलस च्या प्रकाशन समारंभात बोलताना केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी फेरफारीच्या आरोपांवर भाष्य केले.
राजीव कुमार म्हणाले, "बूथ स्तरावरील अधिकाऱ्यांसह लाखो अधिकारी माहिती भरतात. यात काहीही चूक होऊ शकत नाही. जर काही चुकीचे झाले, तर सिस्टीम रेड सिग्नल दाखवते."
सिस्टीममध्ये त्रुटी असू शकत नाही - राजीव कुमार
"निवडणूक आयोग आश्वस्त करू इच्छितो की, सिस्टीममध्ये त्रुटी असू शकत नाही. जर काही त्रुटी असेल, तर ती सिस्टीम ती स्वीकारतच नाही", असे कुमार यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या काळात मतदार यादीतून नाव वगळण्याबरोबरच मतदानाची वेळ संपल्यानंतर वाढलेल्या मतदानाबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहेत. यावरून विरोधी पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला घेरले आहे.
विरोधकांचे आरोप काय?
महाराष्ट्र आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या काळात सत्ताधारी भाजपकडून विरोधी पक्षांना मतदान करणाऱ्या मतदारांची नावे परस्पर मतदार यादीतून वगळण्यात आली, असा आरोप करण्यात आला. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या मधल्या काळावधीत अचानक वाढलेली मतदारांची संख्या यावरही शंका व्यक्त केली जात आहे.