सोशल मीडियावर एका माय-लेकीची गोष्ट जोरदार व्हायरल होत आहे. पतीच्या मृत्यूनंतर एक महिला अनेक वर्ष एकटी जगत होती. आईचं एकटेपण मुलीला पाहवत नव्हतं. म्हणून तिने दुसऱ्या लग्नासाठी आईला सतत प्रोत्साहन दिलं. त्यानंतर आता वयाच्या 50 वर्षांच्या वर्षी आई लग्न करण्यासाठी तयार झाली. माझी आई खूप खूश असते आणि मजा करत आनंदाने जगत असल्याची माहिती लेकीने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मेघालयची राजधानी शिलाँगमध्ये राहणाऱ्या देबाती चक्रवर्ती आणि तिची आई मौशुमी चक्रवर्ती यांची ही गोष्ट आहे. देबातीने दिलेल्या माहितीनुसार, तिचे वडील हे शिलाँगमध्ये एक लोकप्रिय डॉक्टर होते. पण ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचं निधन झालं. तेव्हा आईचं वय हे फक्त 25 वर्षे होतं आणि देबाती अवघ्या दोन वर्षांची होती. वडिलांच्या मृत्यूनंतर त्या दोघी आपल्या आजीकडे राहत होत्या.
देबाती यांची आई टीचर आहे. आईने नेहमीच एक पार्टनर शोधायला हवा होता. माझं लग्न झाल्यावर आईचं काय आणि कसं होणार याची काळजी असायची असं देबातीने म्हटलं आहे. तसेच आईला लग्नासाठी तयार करण्यास खूप वेळ लागला. आधी मैत्री कर आणि मग लग्न कर असा सल्ला आईला दिल्याचं देखील म्हटलं आहे. याच वर्षी मार्चमध्ये आईचं लग्न हे पश्चिम बंगालच्या स्वपन यांच्याशी झालं आहे. दोघेही अगदी आनंदात संसार करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"