चेन्नई : कुख्यात चंदनतस्कर वीरप्पनची मुलही विद्याराणीने शनिवारी भाजपामध्ये प्रवेश केला. विद्याराणी ही वकील आहे. सत्तेत असलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय सचिव मुरलीधर राव यांनी तिला सदस्य बनविले. तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील एका कार्यक्रमात हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी राधाकृष्णन यांनी भाजपाचा पट्टा घालून पक्षात सहभागी केल्याचे घोषित केले.
वीरप्पन आणि मुथ्थुलक्ष्मी यांना दोन मुली आहेत. विद्याराणी ही मोठी तर प्रभा ही धाकटी. विद्याराणी ही 29 वर्षांची आहे. मुथ्थुलक्ष्मी सध्या तामिळनाडूच्या सेलमध्ये त्यांच्या समाजासाठी काम करत आहेत. तसेच वीरप्पनला मदत केल्यामुळे पोलिसांनी त्रास दिलेल्या लोकांनाही त्या मदत करत आहेत.
या प्रवेशावर विद्याराणीने सांगितले की, दोन वर्षांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन यांना मी भेटले होते. तेव्हा त्यांनी भाजपामध्ये येण्याचे निमंत्रण दिले होते. यावर मी विचार करत होते. कोणत्याही जाती-धर्माची पर्वा न करता शिक्षणाद्वारे लोकांचा विकास करायचा आहे. कृष्णागिरीमध्ये सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी गेल्या वर्षापासून शाळा चालवित आहे. मोदींच्या लोककल्याणकारी योजनामुळे प्रभावित होऊन पक्षात प्रवेश केला.