ऑनलाइन लोकमत
तिरुवनंतपुरम, दि. 6 - अनेक राजकारण्यांनी आपल्या मुलाबाळांचे थाटामाटात केलेले शाही विवाहसोहळे तुम्ही पाहिले असतील. त्यावर टीका झाल्याचेही पाहिले असेल. पण साधेपणाचा पुरस्कार करणारे डाव्या पक्षांचे नेते याला अपवाद होते. आता मात्र याच पक्षांमधील काही नेत्यांना मात्र साधेपणाचा विसर पडल्याचे दिसत आहे. केरळमधील सीपीआयच्या एका महिला आमदाराची कन्या आपल्या विवाहात मौल्यवान दागिन्यांनी मढवून आल्याचे समोर आले आहे. या वधूची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यावर याबाबात नाराजी व्यक्त केली जात आहे.
केरळमधील त्रिशूर येथील नत्तिका येथून दोन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या गीता गोपी यांच्या कन्येचा विवाह सोहळा रविवारी संपन्न झाला. या सोहळ्यात गीता यांची कन्या किमती दागदागिन्यांनी मढवून आली होती. मात्र या विवाहाची छायाचित्रे सोशल मीडियावर आल्यापासून या महिला आमदारांवर टीका होऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वीच केरळचे कृषिमंत्री मुल्लाकारा रत्नाकरन यांनी खर्चिक विवाहांचा मुद्दा उठवला होता. तसेच अशा विवाहांना रोखण्यासाठी कायदा करण्याची मागणी केली होता.
दरम्यान, गीता गोपी यांनी आपल्या मुलीचा विवाह साधेपणाने झाला. तसेच इतर आईवडील आपल्या मुलांसाठी खर्च करतात, तेवढेच मी माझ्या मुलीच्या विवाहात केले, असे म्हटले आहे. मात्र पक्षांच्या कार्यकर्त्यामध्ये या प्रकाराबाबत नाराजी आहे.