मुंबई: सोशल मीडियाच्या काळात अनेकजण दैनंदिन आयुष्यातील खास क्षण सर्वांसोबत शेयर करतात. एअर इंडियामध्ये पायलट असलेल्या अश्रिता चिंचणकर यांनी शेयर केलेला असाच एक क्षण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पायलट अश्रितानं तिच्या एअर हॉस्टेस आईला दिलेल्या रिटायरमेंट गिफ्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
एअर इंडियामध्ये पायलट असलेल्या अश्रिता चिंचणकर यांची आई एअर इंडियामध्येच एअर हॉस्टेस होत्या. काल (31 जुलै) त्यांच्या नोकरीचा शेवटचा दिवस होता. 38 वर्ष एअर हॉस्टेस म्हणून काम करणाऱ्या आपल्या आईला अश्रिता यांनी सुंदर निरोप दिला. आईनं नोकरीच्या शेवटच्या दिवशी ज्या विमानात एअर हॉस्टेस म्हणून काम केलं, त्या विमानाचं उड्डाण अश्रिता यांनी केलं. 'माझी आई उद्या एअर हॉस्टेस म्हणून रिटायर होतेय आणि मी त्याच विमानाची फर्स्ट ऑफिसर असणार आहे,' असं ट्विट अश्रिता चिंचणकर यांनी 30 जुलैला केलं होतं. हे ट्विट हजारो जणांनी लाईक आणि शेकडो जणांनी रिट्विट केलं.
अश्रिता या ट्विटमुळे एकाएकी सेलिब्रिटी झाल्या. आई निवृत्त होतानाच क्षण आम्हाला पाहायचाय, असं अनेकांनी अश्रिता यांना ट्विटरवर सांगितलं. यानंतर अश्रिता यांनी आई निवृत्त होत असतानाच तो क्षणदेखील सर्वांसोबत शेयर झाला. तब्बल 38 वर्ष कर्तव्य बजावून निवृत्त होताना अश्रिता यांची आई भावूक झाली होती. त्यांचे डोळे पाणावले होते. सहकाऱ्यांना मिठी मारुन त्यांनी सगळ्यांचा निरोप घेतला मुलीनं पायलट व्हावं, हे त्यांचं स्वप्न होतं. अश्रिता यांनी ते स्वप्न पूर्ण केलंच. यासोबतच आई निवृत्त होताना तिला छान निरोपही दिला. या अविस्मरणीय रिटायरमेंटची जोरदार चर्चा सध्या ट्विटरवर आहे.