Nobel Winner Indian Economist Amartya Sen: नोबेल पारितोषिक विजेते प्रसिद्ध अर्थतज्ञ्ज अमर्त्य सेन यांचे निधन झाल्याचे वृत्त चुकीचे असल्याची माहिती त्यांची कन्या नंदना देब सेन यांनी दिली. अमर्त्य सेन यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त अनेक प्रसारमाध्यमांमध्ये आले होते. त्यानंतर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. अमर्त्य सेन यांना १९९८ मध्ये अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत. कालच नोबेल पारितोषिक जाहीर झालेल्या क्लॉडिया गोल्डिन यांच्या ट्विटर अकाऊंटवरून सेन यांच्या निधनाचे ट्विट करण्यात आले होते. परंतु, ते अकाऊंट बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अमर्त्य सेन यांची मुलगी नंदना यांनी ट्विट करत निधनाचे वृत्त फेटाळले.
अमर्त्य सेन यांचा जन्म ३ नोव्हेंबर १९३३ रोजी झाला. अमर्त्य सेन यांचा जन्म आणि संगोपन विश्व भारती कॅम्पसमध्ये झाले. प्रसिद्ध संस्कृत विद्वान क्षिती सेन या त्यांच्या आजी होत्या. अमर्त्य सेन यांच्या आजी रवींद्रनाथ टागोरांच्या निकटवर्तीय होत्या. त्यांच्या विनंतीवरून टागोरांनी अमर्त्य यांचे नाव ठेवले होते. प्राथमिक शिक्षणानंतर सेन यांनी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. यानंतर ते अमेरिकेतील हॉवर्ड विद्यापीठात गेले. केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी पीएचडीची पदवीही मिळवली. हार्वर्ड विद्यापीठात ते प्राध्यापक होते. ते जाधवपूर विद्यापीठ, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातही शिक्षक होते.